Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Sangli › सर्वच नेत्यांची ‘जाऊ तिथे खाऊ’ वृत्ती 

सर्वच नेत्यांची ‘जाऊ तिथे खाऊ’ वृत्ती 

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 26 2018 12:02AMवाळवाः प्रतिनिधी

स्वातंत्र्यपर्व काळात राष्ट्रप्रेमाने भारावलेली, बलिदानासाठी, सिद्ध झालेली  पिढी  राष्ट्रभक्‍तीने झपाटलेली होती. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवणे शक्य झाले. आज स्वातंत्र्यानंतर ती राष्ट्रभक्‍ती कुठे गेली, सार्‍याच राजकारण्यांचा ‘जाऊ तिथे  खाऊ ’ असा सपाटा सुरू आहे. हे देशाला पोषक नाही, असा सवाल माजी ग्रामविकासमंत्री अण्णासाहेब डांगे यांनी वाळवा येथे केला.

येथील हुतात्मा संकुलाच्या वतीने हुतात्मा किसन अहिर व हुतात्मा नानकसिंग यांच्या 72 व्या स्मृतिदिनानिमित्त ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संकुलाचे नेते वैभव नायकवडी होते. डांगे यांच्या हस्ते हुतात्मा किसन अहिर  व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यांना पुष्पचक्र वाहण्यात आले.

डांगे म्हणाले, रशियासारखा बलाढ्य देश अडचणीत आला आहे.तर अमेरिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशावेळी शेजारचा चीन महासत्ता बनू पाहत आहे. सीमेवरती कुरघोड्या करीत आहे. श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आदी देशांमध्ये आपली ठाणी तयार करून भारताला अडचणीत आणीत आहे.आपल्या देशात कोणालाही त्याचे गांभीर्य नाही. सार्‍याच राजकारण्यांचा ‘जाऊ तिथे  खाऊ ’ असा सपाटा सुरू आहे. हे   देशाला  पोषक   वातावरण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली जाते. मात्र, युद्ध झालेच तर काही देश आपल्या पाठीशी असावेत म्हणूनच ते आंतरराष्ट्रीय वातावरण निर्माण करीत आहेत.

वैभव नायकवडी म्हणाले, खर्‍या खुर्‍या स्वातंत्र्याचा लाभ सामान्य जनतेला झाला नाही. बेरोजगारी, गरिबी असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले.लोकांचा भ्रमनिरास झाला. याविरोधात जनमत तयार व्हावे यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

डॉ.बाबुराव गुरव, हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष बाबुराव बोरगावकर, दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, जि.प.महिला व बालकल्याण सभापती डॉ. सुषमा नायकवडी, बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच   पोपट अहिर, महादेव कांबळे, बाळासाहेब पाटील, अरूण यादव, वसंत वाजे, मोहन सव्वाशे, सावकर कदम, संजय अहिर, उमेश घोरपडे, डॉ. अशोक माळी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.हशिम वलांडकर यांनी आभार मानले. सकाळी हुतात्मा शिक्षण समुहातील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली.