Mon, May 20, 2019 18:11होमपेज › Sangli › 'सीमाभागासह कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करा'

'सीमाभागासह कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करा'

Published On: Mar 12 2018 1:07AM | Last Updated: Mar 12 2018 1:07AMमिरज : शहर प्रतिनिधी        

कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावेळी  साहित्यिक आणि राज्यकर्ते माघार घेतात. बेळगावसह कर्नाटक सीमाभागाच्या वादातही हेच घडले आहे. तेथे जनता मरणयातना भोगत आहे. सर्वोच्च न्यायालयात जो काही निर्णय लागेल तो लागेल; पण तोपर्यंत तर हा भाग राष्ट्रपती राजवटीखाली आणा, अशी स्पष्ट मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मिरजेत केली. सीमाभागात राहणार्‍या वीस लाख मराठी बांधवांचे आशीर्वाद मिळवण्याची ही संधी असताना सध्याचेही सरकार झोपले आहे का? असा प्रश्‍नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, शब्दांगण साहित्यिक व्यासपीठ, मिरज यांच्यावतीने बालगंधर्व नाट्य मंदिरात रविवारी 29 वे साहित्य संमेलन पार पडले.  यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर होत्या.

सबनीस म्हणाले, कर्नाटकात मराठी माणसाच्या मृत्यूनंतर स्मशानात अंत्यसंस्कारासाठीचा अर्जदेखील कन्नडमध्येच भरावा लागतो. मराठीवरचा हा कानडी अत्याचार भयानक आहे. वीस-पंचवीस लाख मराठी बांधवांसाठी महाराष्ट्रातील लोकांनी चळवळ उभी केली पाहिजे. सरकारवर दबाव आणला पाहिजे. सीमाभाग राष्ट्रपती राजवटीखाली आणला पाहिजे. यापूर्वीचे आणि सध्याचे फडणवीस सरकार झोपले आहे का? असेही ते म्हणाले. 

ते म्हणाले, ग्रामीण भागात साहित्य संमेलनाची संख्या वाढली आहे. ती साहित्याची व संस्कृतीची बेटे ठरत आहेत.  मुंबई-पुण्याकडील साहित्याची केंद्रे विद्वेषाची केंद्र बनली आहेत. विद्वेषाने ती जळत आहेत. संमेलनाच्या पालखीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर   यांनी  लिहिलेली घटना ठेवली, हे खूप चांगले झाले. भविष्यात संमेलनाच्या पालखीत घटनेसह मुस्लिम, भटके, आदिवासी  लेखकांची पुस्तके ठेवायला हवीत. लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर, प्रा. चंद्रकुमार नलगे, विजय  चोरमारे, वि. द. कदम, अनुराधा गुरव, मकरंद देशपांडे, संजय मेंढे, विजय धुळूबुळू आदी उपस्थित होते. 

यावेळी लेखक आप्पासाहेब पाटील, प्रतिभा जगदाळे, अरुण इंगवले ,  डॉ. व्ही. एन. शिंदे यांना सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  दुपारच्या सत्रात डॉ. बाबूराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ‘अभिव्यक्‍ती व साहित्यिकांची जबाबदारी’ या विषयावर परिसंवाद झाला. डॉ. राजेंद्र कुंभार सहभागी झाले. त्यानंतर कवीसंमेलन रंगले. संध्याकाळी ‘मोक्ष’ नाटिका सादर झाली. भीमराव धुळूबुळू, नामदेव भोसले, बाबासाहेब आळतेकर, डॉ. विजयकुमार माने, ऋजुता  माने, निर्मला लेंढे  यांनी संयोजन केले. गणेश माळी यांनी स्वागत केले. नाना हलवाई यांनी सूत्रसंचालन केले.