Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Sangli › गुंठेवारी प्रश्‍नांसाठी कायदेशीर लढा

गुंठेवारी प्रश्‍नांसाठी कायदेशीर लढा

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 11:57PMसांगली : प्रतिनिधी

विधीमंडळात 2001 मध्ये गुंठेवारी नियमितीकरणाचा कायदा संमत झाला आहे. तरीही शासनाने 1966 च्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुंठेवारीतील नागरिकांना दंडाच्या नोटिसा दिल्या आहेत. त्या बेकायदेशीर आहेत. या दंडाच्या नोटिसा रद्द करण्यासाठी जनता दलातर्फे कायदेशीर लढा उभारला जाईल, असे प्रतिपादन माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केले. 

जनता दलातर्फे भावे नाट्यगृहात आयोजित गुंठेवारी बचाव मेळाव्यात ते बोलत होते. प्रा. पाटील म्हणाले, सध्या गुंठेवारीतील केवळ काही लोकांनाच तहसीलदारांनी दंडाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ज्या लोकांना नोटिसा आल्या नाहीत त्यांनाही त्या लवकरच मिळतील, त्यामुळे त्यांनीही गाफील राहू नये. कर्जमाफी, वाळू उपसा बंदी यामुळे शासनाचा महसूल कमी झाला आहे. तो महसूल वसूल करण्यासाठीच शासनाने गुंठेवारीत राहणार्‍या लोकांना दंडाच्या नोटिसा पाठविण्याचा घाट घातला आहे. 

विधीमंडळात आपण, तत्कालीन आमदार व्यंकाप्पा पतकी, संभाजी पवार यांनी आवाज उठवून गुंठेवारी नियमितीकरणाच्या कायद्याची पायाभरणी केली. आम्ही तिघेही सभागृहात नसताना हा कायदा संमत करण्यात आला. मात्र या कायद्यातही काही त्रुटी आहेत. मात्र गुंठेवारी नियमितीकरणाचा कायदा हा सांगलीने राज्याला दिला आहे. त्यामुळे आताही गुंठेवारीतील नागरिकांवर होणार्‍या अन्यायालाही सांगलीतूनच वाचा फोडण्यात येणार आहे, असेही प्रा. पाटील यावेळी म्हणाले. 

अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले, सध्या नागरिकांना 1966 च्या कायद्यानुसार नोटिसा आल्या आहेत. शासनाला एक कायदा झाल्यानंतर त्याबाबतचा आधीचा कायदा रद्द होतो याची माहिती नाही का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. गुंठेवारी नियमितीकरण कायद्यानुसार महापालिकेचे आयुक्त जबाबदार अधिकारी असताना तहसीलदारांनी दिलेल्या नोटिसा बेकायदेशीर आहेत. याविरोधात कायदेशीर आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी अ‍ॅड. फैय्याज अहमद झारी, शशिकांत गायकवाड, उत्तम कांबळे यांचे भाषण झाले. गुंठेवारीतील नागरिकांनीही समस्या मांडल्या. स्वागत, प्रास्ताविक जनार्दन गोंधळी यांनी केले. यावेळी विठ्ठल खोत, माजी उपमहापौर मोहन जाधव यांच्यासह गुंठेवारीतील नागरिक उपस्थित होते.