सांगली : प्रतिनिधी
शिवजयंतीची दि. 19 फेब्रुवारी ही तारीख सांस्कृतिक विभाग मंत्री विनोद तावडे यांनी घोषित केली आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुचनेनुसार सरकार चालते, त्यांना ते मान्य आहे का, असा सवाल शिवप्रतापमुक्ती भूमी आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केला.
तिथीनुसार एकच शिवजयंतीचा निर्णय सरकारने घेऊन तोडगा काढावा. अन्यथा छत्रपतींचे नाव घेऊन आलेले सरकार जनता उलथून टाकेल, असे ते म्हणाले. शिंदे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार सत्तेवर असताना विरोधी भाजप-शिवसेना सरकारने शिवजयंतीचे तीन तुकडे केल्याबद्दल टीका करीत होते. पण भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर यावर तोडगा काढला नाही.
ते म्हणाले,भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनीच एक शिवजयंतीसाठी प्रश्न उपस्थित केला. त्यावर विनोद तावडे दि. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीची घोषणा करतात, हा अजब प्रकार आहे. शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी मात्र त्याला विरोध करीत तिथीनुसार शिवजयंती करू, असे जाहीर केले. सरकारने हा वाद संपविण्यासाठी इतिहासतज्ज्ञांची एक समिती नियुक्त करावी असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे अनिल शेटे उपस्थित होते.