Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Sangli › माजी आमदार हाफीज धत्तुरे यांचे निधन

माजी आमदार हाफीज धत्तुरे यांचे निधन

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 11:09PMमिरज : प्रतिनिधी

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे पहिले अध्यक्ष हाफीज धत्तुरे (वय 72) यांचे हृदयविकाराने बुधवारी मध्यरात्री वॉन्लेस रुग्णालयात  निधन झाले. वाढदिवसादिवशीच त्यांचे निधन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त आहे. 

धत्तुरे यांना सोमवारी दुपारी जेवण करीत असताना उलटीचा त्रास होऊन हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने वॉन्लेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्यांच्यावर  शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. परंतु बुधवारी मध्यरात्री त्यांचा रक्तदाब कमी होऊन  हृदयविकाराचा दुसरा झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मावळली.

बुधवारी दुपारी त्यांच्यावर मीरासाहेब दर्गाह आवारातील दफनभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.  अंतिम  दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, पाच विवाहित मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

रोमांचकारी राजकीय प्रवास 

धत्तुरे यांनी सन 1999 व 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. दहा वषार्ंच्या कालावधीमध्ये त्यांनी राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहर व ग्रामीण भागातील विविध कामांना चालना दिली होती. कामगार ते आमदार असा त्यांचा झालेला राजकीय प्रवास रोमांचकारी तसेच कार्यकर्त्यांना कामाची दिशा देणारा ठरला आहे. त्यांनी छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत आपुलकी आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. 

धत्तुरे यांनी दहा वषार्ंच्या आमदारकीच्या कालावधीत प्रामुख्याने गुंठेवारी, वतन जमिनींचा प्रश्‍न सोडविला. प्रशासकीय इमारतीचा प्रश्‍नही मार्गी लावला.  धत्तुरे यांना मौलाना आर्थिक विकास महामंडळाचे पहिले अध्यक्ष होण्याचाही मान मिळाला होता.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले.

कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, माजी  केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी  महापौर   विजय  धुळूबुळू, किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान, व्यापारी संघटनेचे विराज कोकणे, अनिल आमटवणे, बाळासाहेब होनमोरे, नामदेवराव मोहिते, वारकरी सांप्रदाय संघटनेचे ज्ञानेश्‍वर पोतदार, प्रा. प्रमोद इनामदार यांच्यासह शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी धत्तुरे यांचे अंतिम दर्शन घेतले.

आदर्श कार्यकर्ता हरपला : प्रा. शरद पाटील

दफनभूमीत हाफीजभाई धत्तुरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष माजी आमदार  प्रा. शरद पाटील म्हणाले,धत्तुरे यांनी आदर्श कार्यकर्ता कसा असावा, याचा आदर्श घालून दिला.  आमदार  शिवाजीराव नाईक  म्हणाले,धत्तुरे हे नेहमी सर्वसामान्यांची कामे घेऊन येत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा शोक संदेश वाचून दाखविला.  माजी आमदार दिनकर पाटील, उमाजी सनमडीकर, महापौर हारुण शिकलगार, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, भाजपचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, प्रा. चंद्रकांत आंबी, जितेश कदम आदिंची भाषणे झाली.