होमपेज › Sangli › निगडीत हाेतेय विदेशी चवदार भाजीपाल्याची शेती

निगडीत हाेतेय विदेशी चवदार भाजीपाल्याची शेती

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 10:38PMमातीतलं सोनं : विवेक दाभोळे

वारणा खोर्‍यात नाविन्याचा ध्यास घेतलेला शेतकरी सातत्याने क्रॉप पॅटर्न बदलासाठी विविध प्रयोग, नवनवीन पिके घेतो, मात्र उत्पादन चांगले निघून देखील बर्‍याचवेळा बाजारपेठेतील दराच्या अस्थिरतेचा फटका त्याला बसतो. तरी देखील  चिकाटी, जिद्दीने निगडी (ता. शिराळा) येथील पोपट नि. भालेकर यांनी विदेशी भाजीपाल्याची शेती कायम राखली आहे. त्यांची चिकाटी शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरावी.

शिराळा तालुक्यातील उत्तर भाग हा तसा टंचाईग्रस्त भाग! आता जरी काही भागात वाकुर्डे योजनेचे पाणी खेळत असले तरी वीस पंचवीस वर्षांपूर्वी या सार्‍या टापूत टंचाईचीच स्थिती होती.  याच परिसरातील निगडी येथील पोपट भालेकर यांनी शेतीत नाविन्याचा ध्यास कायम ठेवला. सन 1978 मध्ये ते दहावी झालेे. नोकरीसाठी ते मुंबईत गेले. मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये विदेशी भाजीपाला, चायनीज भाजीपाल्यास बारमाही मागणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन एक वर्षांत गावी परत येऊन त्यांनी आपल्या शेतीत विदेशी भाजीपाल्याची लागवड करण्यास सुरुवात केली. 1986 पासून त्यांचा यात जम बसला.  जीकेनी, ब्रोकोली, रेड कॅबेज,  स्नो पीस (वाटाण्यासारखे), आईस बर्ग (घेवड्यासारखे), रॉकेट, लेमन ग्रास (गवती चहाचा एक वाण) आदी विदेशी, चायनीज भाजीपाल्याची शेती त्यांनी केली आहे.  

यातील प्रत्येक भाजी एक ते दीड एकर क्षेत्रात घेतली. उत्पादन देखील चांगले निघते, मात्र दराच्या बाबतीत अस्थिरता असल्याचा त्यांचा अनुभव आहे. सध्या त्यांनी जवळपास दीड एकरात लेमन ग्रासचे पीक घेतले आहे. सन 1990 पासून ते लेमन ग्रासचे पीक घेतात. साधारणपणे लेमन ग्रासच्या काडया प्रतिकिलो 25 रु. नी विकल्या जात होत्या, मात्र आता हा दर 10 रु. च्या घरात आला आहे. तो फारच कमी आहे. याचप्रमाणे ब्रोकोलीच्या दरात देखील आवक वाढल्यास घसरण होते. ब्रोकोलीचे बियाणे महागडे आहे. अनेक कंपन्या बियाणाची कृत्रिम टंचाई करुन चढ्या दराने  विकून शेतकर्‍यांची लूट करतात, मात्र कृषी विभाग लक्ष देत नाही.   

सुरुवातीच्या काळात दर चांगला मिळत होता.  मात्र पुरवठ्यात जर सातत्य राहिले नाही तर मात्र चांगला दर दिला जात नाही. विदेशी भाजीपाल्याची बाजारपेठ क्रॉफर्ड मार्केट येथे होती तोपर्यंत दर चांगले मिळत होते.

सध्या भालेकर यांनी दीड एकरात बेबी कॉर्न तर 35 गुंठ्यात लेमन ग्रासची लागवड केली आहे. शासनाचे लक्ष नाही : विदेशी भाजीपाल्याचा दर कायम राहिला पाहिजे. मोठ्या जिद्दीने विदेशी भाजीपाला लागवडीकडे शेतकरी वळत असताना त्यांना आता सरकारनेच मदतीचा हात देत बाजारपेठेतील दराची हमी दिली तरच  भालेकर  यांच्यासारख्या शेतकर्‍यांच्या जिद्दीला सलाम केल्यासारखे होईल...!

Tags : sangli, Foreign Tasty Vegetable Farm associated with Honey