Thu, Jul 02, 2020 20:23होमपेज › Sangli › अल्पसंख्यांकांच्या प्रश्‍नासाठी कोअर समिती 

अल्पसंख्यांकांच्या प्रश्‍नासाठी कोअर समिती 

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 8:46PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी 

अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कोअर समितीची स्थापना  करण्यात येणार आहे.   ही समिती दर तीन महिन्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्‍नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार  काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

बैठकीस  राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सचिव इजाज अहमद शरीक मसलत, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, हाजिज जतकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला, शफी नायकवडी, असिफ बाबा, अय्याज नायकवडी, शीतल पाटोळे आदी उपस्थित होते.

यावेळी काळम- पाटील म्हणाले, अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कोअर समितीची स्थापना करावी. या समितीत शासकीय अधिकारी, उद्योजक, व्यापारी अशा क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करावा. ही समिती प्रशासन आणि अल्पसंख्यांक समाजातील बांधव यांच्यात समन्वय साधेल. समितीच्या दर तीन महिन्यांनी होणार्‍या बैठकीत अल्पसंख्यांक समाजातील बांधवांच्या समस्यांवर चर्चा होईल, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  

शरीक मसलत म्हणाले, अल्पसंख्यांक बांधवांना त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजना यांची माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी अल्पसंख्यांक आयोगाच्यावतीने लवकरच जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न करू. या शासकीय योजनांची प्रभावी आणि गतीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा स्तरावर एका अल्पसंख्यांक अधिकार्‍याची नेमणूक व्हावी. तसेच, कोअर समितीच्या बैठकीत पोलिस अधिकार्‍यांनाही निमंत्रित करावे.