Mon, Aug 26, 2019 00:39होमपेज › Sangli › उमेदवारांसाठी भाजप लाचार : आमदार कदम 

उमेदवारांसाठी भाजप लाचार : आमदार कदम 

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jul 01 2018 12:14AMसांगली : प्रतिनिधी

सांगली महापालिका निवडणुकीत भाजपला उमेदवारांसाठी लाचार व्हावे लागत आहे, अशी जोरदार टीका युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. मतदान व उमेदवारांसाठी भाजप नेते भेटवस्तूंबरोबर इतर कोणत्याही थराला जातील, अशी बोचरी टीका माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केली.

कदम व पाटील म्हणाले, आजपासून काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. उमेदवारांचा मोठा प्रतिसाद आहे. सर्व नेते व पदाधिकारी एकजुटीने काम करीत आहोत. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. पक्षात बंडखोरी होऊ देणार नाही. निष्ठावंताना न्याय दिला जाईल. त्यांच्या पाठीशी पक्षाची सर्व ताकद उभी केली जाईल. मुलाखती घेतल्यानंतर ती यादी प्रदेशकडे पाठविली जाईल. तसेच नागपूरमध्ये बुधवारी ( दि. 4) प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यात यादीवर चर्चा केली जाईल. त्यानंतर स्थानिक नेत्यांशी चर्चा करून उमेदवारी अंतिम केली जाईल.

ते पुढे म्हणाले, भाजपचा राज्य व देशात सुरू असलेल्या कारभाराचा वाईट अनुभव जनतेला आला आहे. चार वर्षांत केवळ खोटी आश्‍वासने, भूलथापा देऊन जनतेची दिशाभूल करण्याव्यतिरिक्‍त भाजप नेते काहीही करू  शकले नाहीत. 

पाटील म्हणाले, सांगली महापालिका निवडणुकीसाठी तर भाजपला उमेदवार मिळणे मुश्कील झाले आहे. त्यांना दोन अंकी आकडा गाठणेही मुश्कील आहे. जिंकण्यासारखी परिस्थिती नसल्याचे लक्षात आल्यानेच मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आत्मविश्‍वास ढळला आहे. त्यामुळे दुसर्‍या पक्षातील उमेदवारी नाकारलेल्यांवर ते अवलंबून आहेत. विशेषत: आमच्या पक्षातील इच्छुकांवर त्यांचा डोळा आहे. त्यासाठी ते गळ लावून बसले आहेत. उमेदवार मिळण्यासाठी भाजप नेते लाचार झाले आहेत. 

यावेळी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, माजी खासदार व मंत्री प्रतीक पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अभय छाजेड, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष  विशाल पाटील, महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार  आदी उपस्थित होते. 

स्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम : आ. कदम 

आमदार डॉ. कदम व आमदार पाटील यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडीसाठी चर्चा सुरू आहे. पण, त्यांच्याकडून योग्य प्रस्ताव येणे आवश्यक आहे. अन्यथा, आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत.