Sun, May 26, 2019 14:42होमपेज › Sangli › ‘कोल्हापूर - पुणे’ इंटरसिटी रेल्वेसाठी पाठपुरावा

‘कोल्हापूर - पुणे’ इंटरसिटी रेल्वेसाठी पाठपुरावा

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 11:52PMसांगली : प्रतिनिधी

कोल्हापूर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. ‘मिरज-शिर्डी’ पुन्हा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करणार आहे,  अशी माहिती सांगली स्टेशनच्या सल्लागार समितीचे सदस्य संजय निल्लावार यांनी दिली. 
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगली स्टेशनच्या सल्लागार समिती सदस्यपदी संजय निल्लावार यांची निवड झाली आहे. ही निवड तीन वर्षांसाठी आहे. रेल्वेच्या या सल्लागार समितीच्या माध्यमातून स्टेशनवरील सोयी-सुविधा, स्वच्छता, रेल्वेचे वेळापत्रक व प्रवाशांची मते जाऊन रेल्वे प्रशासनाला कळविली जातात. 

निल्लावर म्हणाले, ‘कोल्हापूर-पुणे’ इंटरसिटी सुरू होणे अतिशय आवश्यक आहे. प्रवाशांची मागणी व प्रवाशी संख्या पाहता ही रेल्वे सुरू करणे गरजेचे आहे. ‘कोल्हापूर-शिर्डी’ ही रेल्वे सध्या बंद झालेली आहे. ‘मिरज-शिर्डी’ रेल्वे सुरू केल्यास प्रवासी तसेच भाविकांची मोठी सोय होणार आहे. 

.. तर 8 तास वाचतील

मिरज-हैद्राबाद व्हाया सोलापूर ही रेल्वेे सुरू केल्यास प्रवाशांचे 8 तास वाचतील. सध्या मिरजेतून हैद्राबादला जाण्यास एकोणीस ते बावीस तास लागता. व्हाया सोलापूर रेल्वे सुरू झाल्यास दहा ते बारा तासात पोहोचता येईल. ‘कोल्हापूर-अहमदाबाद’ ही रेल्वे आठवड्यातून एकदा आहे. ‘कोल्हापूर-दिल्ली’ ही रेल्वेही आठवड्यातून एकदा आहे. या रेल्वे आठवड्यातून तीन दिवस, चार दिवस सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही निल्लावर यांनी सांगितले.  कोल्हापूर-नागपूर व्हाया लातूर ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस आहे. ही रेल्वे आठवड्यातून चार दिवस सुरू झाली पाहिजे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती निल्लावर यांनी दिली.