Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Sangli › 148 चारा छावणी चालकांवर गुन्हे दाखल

148 चारा छावणी चालकांवर गुन्हे दाखल

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 12:35AMसांगली  :  प्रतिनिधी

जिल्ह्यात सन 2012-13 आणि सन 2013-14 या दोन वर्षांत दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळी जिल्ह्यातील 148   चारा छावणी आणि डेपो चालक आणि संस्थांनी सुमारे दहा कोटी रुपयांचा घोळ केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.  दरम्यान, या सर्व 148 जणांच्या विरोधात यापूर्वीच दंडात्मक कारवाई करून सुमारे 10 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. आता न्यायालयाच्या आदेशामुळे बोगस बिले सादर करून फसवणूक करणे, आदेशाचे उल्लंघन करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

 सन 2012-13 आणि सन 2013-14 मध्ये  जिल्ह्यातील जत, कडेगाव, मिरज, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि आटपाडी हे तालुके दुष्काळग्रस्त होते. त्यावेळी जनारे जगवण्यासाठी चारा छावण्या आणि चारा डेपो सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी  प्रशासनाकडून केलेल्या तपासणीनुसार जनावरांना टॅगिंग नसणे, बार कोड नसणे, निवारा नसणे, जनावर संख्येमध्ये तफावत असणे अशा अनेक त्रुटी आढळल्या होत्या. सक्षम प्राधिकार्‍याने दिलेल्या अटी व शर्तींचा भंग करण्यात आल्याचे आढळले होते. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

त्यामुळेे संबंधितांच्या देयकामधून सुमारे 10 कोटी रुपये प्रशासनाने कपात केले होते. मात्र प्रशासनाने ती केवळ  दंडात्मक कारवाई केली होती. प्रशासनाने केलेल्या तपासणीत सांगलीसह सातारा, सोलापूर जिल्ह्यातही असाच घोळ झाल्याचे पुढे आले. त्यामुळे सांगोला (जि. सोलापूर) येथील गोरख आनंदा घाडगे यांनी 2013 मध्ये यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली. शासनाने दि. 6 सप्टेंबर 2017 मध्ये  या चारा छावणी चालकांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शासनाने दि.15 डिसेंबर 2017 रोजी या छावणी चालक संस्था विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या संबंधीत तालुक्यातील तहसिलदारांनी पोलिस ठाण्यात चारा छावण्या चालका, संस्था विरोधात गुन्हे दाखल केले.