Mon, Jun 17, 2019 10:46होमपेज › Sangli › मिरजेतील बाजारात फुलांचे दर कोसळले

मिरजेतील बाजारात फुलांचे दर कोसळले

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 9:23PMमालगाव : वार्ताहर

मिरजेत सर्वच फुलांचे दर कोसळले आहेत. झेंडू फुलांचा  दर पाच ते दहा रुपयांपर्यंत खाली  आल्याने  उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. फुलांची तोडणी, वाहतूक खर्चही या दरातून निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

फूलउत्पादक शेतकर्‍यांना सध्या दरदिवशी शेकडो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो आहे. तर मार्केट कमिटीच्या ढिसाळ नियोजनामुळे बाजार परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे.मिरज पूर्वभागातील मालगाव, कळंबी, सोनी, भोसे आणि तानंगसह तासगाव, कवठेमहांकाळ, शिरोळ परिसरातून मोठ्या प्रमाणात झेंडू, गुलाब, निशिंगध, गलांडा, शेवंती अशा फुलांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मिरज येथील फुलांचा बाजार प्रसिध्द आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. 

कर्नाटकातील हुबळी, धारवाड, विजापूर, गदग, अथणी, चिक्कोडी व कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पर्यंत फुले दररोज पाठवली जातात.सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध फुलांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सर्वाधिक फटका झेंडूच्या फुलांना बसला आहे. कोलकत्ता, ऐरोगोल्ड पिवळा व लाल अशा झेंडू फुलांची विक्रमी आवक होत आहे. त्यामुळे दर पाच ते दहा रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. 

तोडणी, वाहतूक व कमिशन वजा जाता शेतकर्‍यांना बाजारातून मोकळ्या हातानेच परतावे लागत आहे. गुलाब शेकडा शंभर असा दर आहे. निशिगंध पन्नास,  शेवंती पन्नास रुपये किलो असे दर खाली आले आहेत. गलांडा सत्तर रुपया किलो दर आहे. शीतगृहातील जर्बेरा, कार्नेशन, डचगुलाबासह इतर फुलांच्या दरामध्येही मोठी घसरण झाली आहे.

शेतकरी संकटात; रोपवाटिका जोमात

श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच झेंडूच्या दरात घसरण सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. मात्र रोपवाटिका चालक व बियाणे  विक्रेते जोमात आहेत. कारण त्यांचा व्यवसाय सुरूच आहे. किमान तोडणी, वाहतूक व औषधांचा खर्च निघत नसल्याने फूलशेतीद्वारे कुटुंब खर्च चालवणे अवघड होते आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.