होमपेज › Sangli › उसाच्या गावात फुलांची शेती

उसाच्या गावात फुलांची शेती

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 10:24PMमातीतलं सोनं : विवेक दाभोळे

पारंपरिक शेतीचा ढाचा आता बदलू लागला आहे. तर नवीन प्रयोग, नवीन पिके, फळभाजी, विदेशी भाजीपाला शेती यासारखे पर्याय प्रयोगशील शेतकर्‍यांना खुणावू लागले आहेत. शेतीत नाविण्याचा प्रयोग शेतकर्‍यांना भावतो आहे तो फूलशेतीचा! आज ऊसपट्ट्यातील अनेक गावांनी फुलांचे गाव हा सार्थ लौकिक प्राप्त केला आहे.

सांगली - इस्लामपूर राज्य महामार्गालगत कृष्णाकाठी वसलेल्या  तुंग या गावाने आज फूलशेतीत राज्यात अग्रस्थान पटकावले आहे. या गावात सध्या शेवंतीच्या फुलांचे एका तोड्याला किमान 400 हून अधिक  क्रेटचे उत्पादन निघते आहे. याच गावातील चेतन पाटील या युवा शेतकर्‍याने फूलशेतीत उच्चांकी उत्पादन घेण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.  चेतन पाटील यांनी दीड एकराचा शेवंतीचा प्लॉट घेतला आहे. एप्रिलअखेरीस  त्यांनी पूर्वा व्हाईट जातीच्या शेवंती रोपांची लागण केली. दीड एकरात जवळपास 15 हजार रोपे लागली. साधारपणे एका रोपासाठी साडेतीन रुपयांचा खर्च आला.  यात पाण्यासाठी ठिबकचा अवलंब केला आहे. मात्र त्याआधी मल्चिंग तसेच शेतीची चांगली पूर्वमशागत केली.  तसेच  ठिबक पध्दतीचा अवलंब केला.  लागणीनंतर रोपांची वाढ जोमाने सुरू झाली. मात्र प्रत्येक आठवड्याला  मावा, अळी यासाठी कीडप्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागते. कारण शेवंतीच्या रोपांना मावा किडी तसेच अळीपासून फारच जपावे लागते. यासाठी प्रत्येक पंधरवड्याला मावा प्रतिबंधांसाठी औषध फवारणी करावी लागते.  

प्रयोग म्हणून तरी फूलशेतीकडे वळा..

क्रॉप पॅटर्न बदलाची सातत्याने चर्चा होत आहे. उसासारखे  एक आणि एकच पीक घेतल्याने जमिनीची उत्पादकता घटू लागली आहे. तर पाण्याचा तसेच प्रामुख्याने उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांच्या मनमानीपणाच्या वापरामुळे पिकावू जमिनी नापीक होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अशा काळात पिकांचा फेरपालट म्हणून तसेच किमान एक वेगळा प्रयोग म्हणून तरी शक्य आहे त्या शेतकर्‍यांनी किमान एका एकरात तरी फूलशेतीचा प्रयोग करण्याची गरज आहेे. फूलशेती उत्पादनात आघाडी घेतलेले चेतन पाटील यांनी देखील याला दुजोरा दिला.