Tue, May 21, 2019 12:42होमपेज › Sangli › शेरीनाल्यासाठी पाच पंप; पंपहाऊस उभारणी

शेरीनाल्यासाठी पाच पंप; पंपहाऊस उभारणी

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 07 2018 10:43PMसांगली : प्रतिनिधी

कृष्णा नदीत शेरीनाल्यासह अन्य सांडपाणी मिसळत आहे. ते प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने 300 एचपीचे पाच पंप बसवण्याचा निर्णय महापौर हारुण शिकलगार, आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी आढावा बैठकीत घेतला. सोबतच सरकारी घाटावर नव्याने पंप-संप हाऊस बांधण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

या पाच पंपांच्या माध्यमातून शेरीनाल्यातील सर्व सांडपाणी उपसा करून धुळगाव येथे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णेचे प्रदूषण कायमचे थांबेल, असा विश्‍वास  व्यक्‍त करण्यात आला.

शेरीनाला शुद्धीकरण योजना राबवूनही कृष्णा नदीत शहराचे सांडपाणी मिसळत आहे. चारच दिवसांपूर्वी नदीत दूषित पाण्यामुळे नदीतील मासे मृत झाले.  त्याची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. याबाबत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनीही नदी प्रदूषणाबद्दल महापालिका अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. कारवाईचे आदेश दिले आहेत. 

यामुळे खेबुडकर यांच्या कार्यालयात शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदूषण रोखण्याबाबत तातडीची बैठक पार पडली. यावेळी गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, पालिकेच्या ड्रेनेज विभागाचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते.

बैठकीत जलनि:स्सारण शीतल पाटील म्हणाले, शेरीनाल्यातील सांडपाणी उचलून कवलापूर येथील संप व पंप हाऊसमध्ये सोडले आहे. तेथून धुळगाव येथे प्रक्रिया करून ते  शेतीला दिले जाते. 

गेल्या काही दिवसांपासून शेरीनाल्यातील पाणी उपसा करणारे पंप बंद आहेत. त्यामुळे सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळले जाते. त्यामुळे वारंवार नदी प्रदूषित होते. नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. नदीत मासे मरतात. शेरीनाल्यातील पाणी शंभर टक्के उपसा केल्याशिवाय हा प्रश्‍न सुटणार नाही. त्यासाठी दहा पंपांची गरज आहे. मात्र पालिकेने पाचच पंप बसवले आहेत. त्यातील एक खराब आहे. योजनेच्या मूळ आराखड्यानुसार आणखी पाच पंप बसविणे आवश्यक असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले. जीवन प्राधिकरण्याच्या अधिकार्‍यांनीही हे पंप बसवल्यास शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळणार नाही, असे सांगितले.

महापौर शिकलगार, आयुक्त खेबुडकर यांनी तातडीने यासाठी आराखडा करण्याचे आणि त्यानुसार पंप खरेदी करण्याचे आदेश दिले. जीवन प्राधीकरण्याच्या माध्यमातून 1 कोटी 20 लाखांचे 300 एचपीचे पाच पंप येत्या तीन महिन्यात खरेदी करण्याचा निर्णय झाला. यासाठी दोन दिवसांत निविदा काढण्याचे आदेश खेबुडकर यांनी दिले.

सरकारी घाट येथे शहरातून वाहणारा मोठा नाला थेट नदीत मिसळतो. या नाल्यातून थेट नदीत रोज सुमारे आठ ते दहा एमएलडी सांडपाणी नदीत जाते. ते रोखण्यासाठी नवीन संप व पंप हाऊस उभारण्यात येणार आहे.  चार कोटी 20 लाखांचा हा प्रस्ताव असून तो शासनाकडे पाठवण्यात आला. 

खेबुडकर म्हणाले,  शेरीनाला, सरकारी घाट व हरिपूर रोडवरील नाल्यातून रोज कृष्णा नदीत सुमारे 30 एमएलडी सांडपाणी मिसळते. शेरीनाल्यातून मिसळणारे पाणी थांबवण्यासाठी नवीन पाच पंप बसवण्यात येणार आहेत.