Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Sangli › पाच पिस्तूल, दहा काडतुसे जप्‍त

पाच पिस्तूल, दहा काडतुसे जप्‍त

Published On: May 21 2018 1:04AM | Last Updated: May 20 2018 11:33PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरात संशयास्पदरीत्या फिरणार्‍या दोघांना अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीची 5 पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सौरभ विजय कुलकर्णी (वय 21, रा. गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा), सौरभ सुनील जाधव (22, रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे, सध्या रा. गुरसाळे, ता. खटाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

गुंडाविरोधी पथकाने रविवारी दुपारी ही कारवाई केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुंडाविरोधी पथकाला जिल्ह्यात अवैध शस्त्रे विक्री करणार्‍या टोळ्यांसह व्यक्‍तींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. रविवारी दुपारी दोन युवक मोटारसायकलवरून शंभर फुटी रस्ता परिसरात पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह परिसरात सापळा लावला होता. खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार मोटारसायकलवरून दोघे संशयित आल्यानंतर त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये पाच देशी बनावटीची पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे असल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने अटक करण्यात आली. दोघांकडेही ही पिस्तूल कोठून आणली, सांगलीत ते कोणाला विक्री करणार होते याबाबत अधिक तपास सुरू आहे. या दोघांनीही ती पिस्तूल कोठून आणली याचा तपास करून सांगलीत ती खरेदी करणार्‍याचाही शोध घेतला जाईल असे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले. सहाय्यक निरीक्षक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली महेश आवळे, शंकर पाटील, सागर लवटे, वैभव पाटील, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.