Wed, Mar 27, 2019 04:33होमपेज › Sangli › बालसुधारगृहातून पाच अल्पवयीन संशयित पसार

बालसुधारगृहातून पाच अल्पवयीन संशयित पसार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

येथील दादूकाका भिडे  बालसुधारगृहातून पाच अल्पवयीन संशयितांनी पलायन केले. खिडकीचे गज कापून त्यांनी हे कृत्य केले. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. यात खुनातील एक, घरफोडीतील तीन आणि गोव्यातील एकजण किरकोळ गुन्ह्यातील संशयित आहे.  

दरम्यान, पोलिसांनी या पळालेल्या संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. बाल सुधारगृहात सराईत बाल गुन्हेगारांसाठी स्वतंत्र खोली आहे. या खोलीत सहाजण आहेत.  रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले. त्या खोलीत सहाजण होते. रात्री उशिरा त्यांनी हेक्सॉब्लेडच्या सहाय्याने खिडकीचे गज कापले. त्यातील एकाला धमकावून खोलीतच झोपण्यास सांगितले. सकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार चव्हाट्यावर आला. 

पळालेल्यांमध्ये तीन जण घरफोडीतील संशयित आरोपी आहेत. एकजण मंगळवारी सांगलीत झालेल्या खून प्रकरणातील संशयित आहे. त्याचा सहभाग यापूर्वीच्याही  एका  जबरी चोरीच्या गुन्ह्यात होता. त्यावेळीही त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी तो जामिनावर सुटून बाहेर आला.  

मात्र गुरुवारी तो खुनाच्या गुन्ह्यात सापडला. त्यामुळे त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतील आणि लूटमारीच्या प्रकारांना आळा बसेल, असे पोलिसांना वाटत होते. मात्र ज्या दिवशी बालसुधारगृहात त्याला ठेवण्यात आले, त्याच रात्री त्याने पलायन केले आहे. कोथळे प्रकरणामुळे सांगलीचे पोलिस चर्चेत  आहेत. आता बालसुधारगृहातून संशयित आरोपी  पळाल्याने पोलिसांना आणखी एक धक्का बसला आहे. 

हेक्सॉब्लेड बाहेरून पळवल्याचा संशय

ज्या हेक्सॉब्लेडने खिडकीचे गज कापण्यात आले. ते ब्लेड सुधारगृहात कोठून आले, याचा शोध घेण्यात येत आहे. हे ब्लेड कोणीतरी बाहेरून पुरविले असावे, असा संशय आहे. त्यामुळे बालसुधारगृहाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.