Thu, Apr 25, 2019 23:25होमपेज › Sangli › स्वच्छ अ‍ॅपमध्ये सांगली राज्यात प्रथम

स्वच्छ अ‍ॅपमध्ये सांगली राज्यात प्रथम

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 13 2018 10:19PMसांगली : प्रतिनिधी

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी स्वच्छ अ‍ॅप स्पर्धेत सां.मि. कु. महापालिकेने आता राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानुसार विकासकामांसाठी 20 कोटी रुपयांचे अनुदानरूपी बक्षीस निश्‍चित झाले आहे. देशात सांगली महापालिका 15 व्या क्रमांकावर आहे. आता स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाच्या पाहणीसाठी 22 रोजी शासनाची टीम सांगलीला येणार आहे. 

शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत स्वच्छ शहर स्पर्धा सुरू आहे. त्याअंतर्गत मोबाईल अ‍ॅपवरही स्वच्छतेच्या तक्रारी पाठविणे, निवारण करणे आदींचा सहभाग आहे. यासाठीही स्पर्धा सुरू आहे. त्याअंतर्गत प्लास्टिकमुक्तीसाठी कापडी पिशव्यांचा वापर, खत निर्मिती, तयार खताचे ब्रॅन्डिग याबरोबरच लोकसहभाग वाढावा यासाठी आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील आदींसह टीम प्रयत्नशील आहे. नगरसेवक बाळासाहेब काकडे यांनी स्वच्छ अभियानात राबणार्‍या कर्मचार्‍यांसाठी एक हजाराहून अधिक मास्क दिले आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी अ‍ॅप डाऊनलोड करुन घेणे, अ‍ॅपव्दारे तक्रारी पाठवावयास लावणे, तक्रारीचे 24 तासात निवारण करणे, नवीन  सुलभ शौचालये सुरू करणे, लोकसहभाग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

जानेवारीपासून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सुरुवात झाली आहे. एक ते दहा लाखापर्यंत लोकसंख्या असणार्‍या शहरांसाठी ही स्पर्धा आहे. सांगली महापालिकेत आतापर्यंत 19 हजार 120 नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. लोकसंख्येच्या 3.70 टक्के लोकांनी अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. 4 हजाराहून अधिक नागरिक तक्रारी अ‍ॅपवर डाऊनलोड करून पाठवतात. याचे निराकरण प्रशासन 24 तासात करीत आहे. या अंतर्गत आठवड्याला सर्व्हे होतो. यामध्ये गेल्या आठवड्यात स्पर्धेत सांगली महापालिका राज्यात दुसर्‍या क्रमांकावर, तर देशात 17 व्या क्रमांकावर होती. आता राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. 

शहराचे स्वच्छ सर्वेक्षण करण्यासाठी शासनाची टीम 22 फेब्रुवारीला येणार आहे.  ही टीम स्वच्छतेबाबत महापालिका राबवत असलेल्या उपाययोजनांची तपासणी करणार आहे. यासाठी काही भागाला भेटी देणार आहे.