Thu, Mar 21, 2019 23:23
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › तरूणावर गोळीबार; दोघांना अटक

तरूणावर गोळीबार; दोघांना अटक

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:26AMसांगली : प्रतिनिधी

कवठेमहांकाळ येथे मुकुंद ऊर्फ सोन्या दुधाळ (रा. कोंगनोळी) याच्यावर गोळीबार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. दिनेश बाळासाहेब राजमाने (वय 22), दत्तात्रय ऊर्फ बंडू मनोहर भुसनूर (वय 23, दोघेही रा. कोंगनोळी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, मोटारसायकल, दोन हेल्मेट जप्त करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. 

कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील सोन्या दुधाळ हा मोटारसायकल वरून  कवठेमहांकाळहून  कोंगनोळीकडे जात होता. हिंगणगावजवळील पेट्रोल पंपाजवळ दुधाळ हा थांबला होता. त्यावेळी मोटारसायकलवरून पाठीमागून आलेल्या दोघांनी अगदी जवळून दुधाळ याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये दुधाळ याच्या डोक्यात गोळी घुसून तो जमिनीवर कोसळला. त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबाराचा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने हालचाली सुरू केल्या. दुधाळ याच्यावर मिरजेच्या मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

यातील संशयितांना पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. दिनेश राजमाने, दत्तात्रय भुसनूर मोटारसायकलवरून पंढरपूर रस्त्याने घोरपडी फाटामार्गे मिरजेकडे जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने घोरपडी फाटा येथे सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सोन्या दुधाळवर गोळीबार केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोटारसायकल (एमएच 04 ईके 4051), दोन हेल्मेट, देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांनाही कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, सागर पाटील, जितू जाधव, निलेश कदम, अमित परीट, चेतन महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

पूर्ववैमनस्यातून हल्ल्याची शक्यता...

दरम्यान दोघाही संशयितांनी नेमका कोणत्या कारणावरून हल्ला केला याचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मात्र सोन्या दुधाळ आणि दिनेश राजमाने व दत्तात्रय भुसनूर यांच्यात वाद झाला होता. त्या वादातूनच सोन्यावर गोळीबार केल्याची माहिती पुढे आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. मात्र नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नसल्याचे सांगण्यात आले.