Wed, Sep 19, 2018 10:33होमपेज › Sangli › काँग्रेसचा प्रचार करणारे दोन कर्मचारी बडतर्फ

काँग्रेसचा प्रचार करणारे दोन कर्मचारी बडतर्फ

Published On: Jul 02 2018 1:48AM | Last Updated: Jul 02 2018 12:39AMसांगली : प्रतिनिधी

आचारसंहिता काळात काँग्रेसचा प्रचार करणार्‍या महापालिकेच्या दोघा कर्मचार्‍यांना रविवारी मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी बडतर्फ केले. सफाई कर्मचारी चंद्रबोधी प्रदीप एरंडोलीकर आणि कबड्डी खेळाडू स्वप्निल दत्तात्रय कदम अशी दोघांची नावे आहेत. ते दोघेही मानधनावर महापालिकेच्या सेवेत कार्यरत होते. त्या दोघांचे रॅलीतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याबाबत तक्रारी आल्याने आयुक्‍तांनी चौकशी  करून कारवाईचा बडगा उगारला. 

महापालिकेत राजकीय हस्तक्षेपाने भरती झालेल्या मानधनावरील कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. विशेषतः खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर सेवेत घेण्यात आले आहे. हे मानधनावरील कर्मचारी पक्षाचे कार्यकर्तेच असतात. त्यानुसारच ते काम करीत असतात; परंतु त्यांना आचारसंहितेचे बंधन लागू असते. त्यांनी कुठल्याही पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात, प्रचार फेरीत सहभागी होऊ नये, असे स्पष्ट संकेत आहेत. तसे खेबुडकर यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत.  असे आसतानाही चंद्रबोधी एरंडोलीकर व स्वप्निल कदम हे शनिवारी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतींच्या कार्यक्रमात दिसून आले.  हे दोघे कर्मचारी इच्छुकाच्या समर्थन रॅलीत सहभागी झाले होते. त्याचे छायाचित्र सोशल मीडियावरही व्हायरल झाले. त्यानंतर खेबुडकर यांच्याकडे तक्रारी आल्या. त्यानुसार आयुक्‍तांनी त्या तक्रारींची खातरजमा करून बडतर्फीची 
कारवाई केली.