Thu, Jul 18, 2019 15:06होमपेज › Sangli › अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जाहीर

अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जाहीर

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 9:51PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी जाहीर झाली आहे. काँग्रेसला 42 आणि राष्ट्रवादीला 29 असे जागांचे वाटप करण्यात आले आहे. सांगलीवाडीत 3 व मिरजेत 2  जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. दोन्ही पक्षांनी ताकदीनुसार प्रभाग वाटून घेतले आहेत.दोन्ही पक्षांची प्रभावार ताकद लक्षात घेऊन जागावाटप केले आहे. भाजपच्या निवडणूक तंत्राचा मुकाबला करण्यासाठी  प्रबळ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी रस्सीखेच सुरू होती. बैठकावर-बैठका होत होत्या. कुणाचे तिकीट कापायचे, कुणाला उमेदवारी द्यायची, कोण निवडून येईल, विरोधकांची ताकद किती आहे, याचा अंदाज घेत दोन्ही पक्षांत खल सुरू होता. मात्र, अगदी बुधवारी सकाळपर्यंत आघाडीचा कोणता फॉर्म्युला ठरला आहे, त्याची माहिती बाहेर कुणालाही नव्हती.विरोधकांना बेसावध ठेवण्यासाठी व संधी नाकारलेले उमेदवार भाजपमध्ये जाऊ नयेत यासाठी बुधवारी शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देऊन आघाडी जाहीर केली. 

या आघाडीची घोषणा राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील, काँग्रेस नेते आमदार विश्‍वजित कदम, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी पत्रकार परिषदेत  केली. यामध्ये काँग्रेसला 42 आणि राष्ट्रवादीला 29 जागा मिळाल्या आहेत. सांगलीवाडीत  तीन व मिरजेत दोन जागांसाठी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. मिरजेतील प्रभाग 5 मध्ये काँग्रेसकडून संजय मेंढे, बबिता मेंढे, नाजविन पिरजादे, करण जामदार हे लढणार आहेत. तर राष्ट्रवादीकडून  मालन हुलवान, इद्रिस नायकवडी हे लढणार आहेत. सांगलीवाडीतील प्रभाग 13 मध्ये काँग्रेसकडून महाबळेश्‍वर चौगुले, शुभांगी पवार, दिलीप पाटील हे लढणार आहेत. तर राष्ट्रवादीतर्फे अभिजित कोळी, नूतन कदम, हरिदास पाटील हे उमेदवार असतील. या मैत्रीपूर्ण लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी नाराजांची आज सांगलीत बैठक

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीची यादी जाहीर होताच काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. शेवटच्या क्षणापर्यंत गोपनीयता बाळगल्याने हे सर्वजण अंधारात होते. यामध्ये काँग्रेसमधील नाराजांची संख्या मोठी आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील या सर्व नाराजांनी एकत्र मोट बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासाठी गुरुवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील व्यूहरचना ठरविण्यात येणार आहे.

निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे उमेदवार निश्‍चितीत मोठी रस्सीखेच सुरू होती. बुधवारी उमेदवार याद्यांचे खल करताना याबाबतचा अनेकांना अंदाजही आला. परंतु शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्वांनी प्रतिक्षा केली. यामध्ये प्रामुख्याने मदनभाऊ पाटील गटाच्या निष्ठावंतांना डावलल्याचा सूर नाराजांतून व्यक्‍त होत आहे. आघाडीतून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील इच्छुकांना फटका बसला आहे. यासंदर्भात आता उठाव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डावललेल्या तीनही शहरातील इच्छुकांनी यासाठी बैठक आयोजित केली आहे. निष्ठावंतांना बाहेरच्या वाटा दाखवून अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या बैठकीद्वारे तिन्ही शहरात ज्या-ज्या प्रभागात अन्याय झाला प्रसंगी त्या सर्वच ठिकाणी अपक्षांचे पॅनेल उभारून ताकद दाखवू, असा इशारा दिला आहे.