सांगली : प्रतिनिधी
पावसाचे प्रमाण कमी असल्याने आटपाडी तालुक्यात पाणीटंचाई जाणवते आहे. या पार्श्वभूमीवर उरमोडी प्रकल्पाच्या पाण्याने राजेवाडी तलाव भरून घ्यावा, असे आदेश कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना दिले. वारणाली वसाहत येथील विश्रामधाममध्ये ही बैठक पार पडली.
जि. प. चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, सातारा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. धुळे, कृष्णा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एच. फाळके हे उपस्थित होते.
आटपाडी तालुक्यातील दिघंची, कौठुळी, लिंगीवरे गावात यावर्षी अत्यंत कमी पाउस पडला आहे.त्यामुळे उरमोडी प्रकल्पातून पाणी द्यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली. हे पाणी या वर्षापुरते द्यावे. जिहे कठापूर उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यावर पुढील वर्षांपासून पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी मागणी केली.
उरमोडी प्रकल्पाचे पाणी सध्या खटाव व माण तालुक्यात पोहोचते. याचा खासदार पाटील यांनी आढावा घेतला. यावर श्री. घोगरे यांनी हे पाणी उरमोडी धरणातून कण्हेर डावा कालवा - आरफळ डावा कालवा असे 44 किलोमीटरपर्यंत येते, असे सांगितले. ते म्हणाले, तेथून वाठार किरोली व कोंबडेवाडी येथील पंपगृहातून हे पाणी पंपाद्वारे उचलून खटाव डावातीर कालव्याद्वारे व पुढे माण कालवा नेऊन तेथून पुढे ते वडजल, दिवडमार्गे माणगंगा नदीत नेता येईल.
घोगरे म्हणाले, हे पाणी माणगंगा नदीत सोडले, की ते राजेवाडी तलावात नेता येईल. सध्या खटाव व माण तालुक्यात आवर्तन सुरू आहे. ते पाणी पुढे राजेवाडी तलावात सोडण्यासाठी आदेश देण्यात आले. या आदेशाप्रमाणे दि. 27 ऑगस्ट ते दि. 15 सप्टेंबर या कालावधीत पाणी माणगंगा नदीत जाऊ शकते.
ते म्हणाले, ही मागणी एका महिन्यासाठी असल्याने दरदिवशी 4 लाख र याप्रमाणे वीजबिल 1.20 कोटी रुपये येणार आहे. खासदार पाटील यांनी याची अंमलबजावणी करण्याचे संबंधित अधिकार्यांना आदेश दिले.