Mon, Apr 22, 2019 23:42होमपेज › Sangli › प्रकाश आंबेडकरांवर खुनाचा गुन्हा दाखल करा

प्रकाश आंबेडकरांवर खुनाचा गुन्हा दाखल करा

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 10:57PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

वढू येथील घटनेच्या पडसादात मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा  गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली. विविध समाजाच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांचे समर्थन यावेळी केले. तसेच त्यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणीही करण्यात आली. 

चौगुले म्हणाले, गेल्या चार-पाच दिवसांत राज्यातील वातावरण दूषित झाले आहे. जातीयवादी लोकांनी भिडे यांना लक्ष्य केले आहे. त्यांचा वढू, भीमा-कोरेगाव येथील घडलेल्या घटनांशी कसलाही संबंध नाही. त्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य  केलेले नव्हते. भिडेंवर दाखल करण्यात आलेला अ‍ॅट्रॉसिटीचा तसेच अन्य गुन्हे मागे घ्यावेत. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी जातीयवादी शक्ती कार्यरत झाल्या आहेत. परकीय शक्तीच्या मदतीतून काही लोक समाजात द्वेष पसरवत आहेत. 

प्रकाश आंबेडकरांना भिडेंचे नाव सांगणार्‍यांची सखोल चौकशी करावी. तेथील घटनेच्या निषेधार्थ उठलेल्या पडसादात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच तोडफोड करणार्‍यांकडून ती वसूल करण्यात यावी. भिडे यांना मानणारे सर्व समाजात लोक आहेत. त्यांनी कधीही जातीपातीचा विचार केला नाही. शिवप्रतिष्ठानमध्ये सर्व जातींचे धारकरी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्म याविषयीच ते प्रबोधन करीत असतात. त्यांनी कधीही कोणत्याही जातीचा द्वेष केला नाही, असेही चौगुले म्हणाले. 

यावेळी मातंग समाजाचे प्रतिनिधी अभिमन्यू चौगुले, बुरूड समाजाचे अध्यक्ष शशिकांत नागे, वाल्मिकी म्हेतर समाजाचे प्रतिनिधी महेंद्र चंडाळे, भावसार समाजाचे प्रवक्ते अमित करमुसे, वीरशैव माळी समाजाचे दत्तात्रय माळी, कैकाडी समाजाचे अंकुश माने, शिंपी समाजाचे मोहन पतंगे, मराठा स्वराज्य संघाचे प्रदीप बर्गे, भोई समाजाचे संतोष लोखंडे, भटक्या विमुक्त समाजाचे सचिन पवार, परीट समाजाचे मनोहर साळुंखे, गोसावी समाजाचे संजय गोसावी, चर्मकार समाजाचे गणेश चिकोडे, धनगर समाजाचे विनायक एडके यांनी भिडेंवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.