Thu, Jun 27, 2019 02:06होमपेज › Sangli › तासगावमध्ये दोन गटात तुफान राडा

तासगावमध्ये दोन गटात तुफान राडा

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:01AMतासगाव : शहर प्रतिनिधी

शहरातील स्वामी रामानंद भारती महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या चिंचणी व वरचे गल्‍ली येथील विद्यार्थ्यांच्या दोन गटात तीन दिवस धुमसणार्‍या किरकोळ कारणावरून  गुरूवारी सकाळी जोरदार राडा झाला. शहरातील सिध्देश्‍वर चौक, बसस्थानक, मार्केट यार्ड तसेच बाजारात एकमेकांचा पाठलाग करुन रॉडने मारहाण करण्याचा गंभीर प्रकार झाला.या प्रकारात एकजण रॉडने बेदम मारल्याने गंभीर जखमी झाला आहे. मात्र एवढा गंभीर प्रकार होऊनही तासगाव पोलिस ठाण्यात मात्र रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची नोंद नव्हती.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी  : भारती महाविद्यालयात चिंचणी आणि वरचे गल्लीचे काही तरुण शिक्षण घेतात.  या तरुणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादावादी सुरू होती. एकमेकांकडे तिरके बघणे यासह अन्य कारणांवरून हा वाद सुरू होता. दरम्यान, या वादावादीचे रुपांतर गुरूवारी हाणामारीत झाले. हाटकेश्वर मंदिराजवळ हे दोन गट समोरासमोर आले. वादावादी सुरू झाली. वाद वाढत जाऊन हे तरुण एकमेकाला ढकलत शिवीगाळ करू लागले. यावेळी एकाच्या हातावर रॉड मारल्याने तो जखमी झाला. 

जखमी तरुण व जमाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास चालले होते. दरम्यान त्याचवेळी मारहाण करणार्‍यांपैकी एक तरुण बसस्थानकावर दिसताच हे तरुण तिकडे गेले. दोन्ही गटांच्या तरुणांनी पाठलाग करून एकमेकांना लाथा बुक्क्यांनी तसेच रॉडने मारहाण करायला सुरवात केली. शहरात गुरूवारचा बाजार असल्याने वर्दळ होती. या बाजारातून एकमेकांचा पाठलाग करुन मारहाण करण्यात आली. मात्र याबाबत पोलिस ठाण्यात कसलीही माहिती नव्हती.  उशिरा माहिती झाल्यानंतर पोलिसांना विविध चौकांमध्ये रवाना करण्यात आले.

पोलिसांचे गोपनीय, निर्भया पथक निष्क्रिय?

शहरामध्ये गुरूवारी सलग चौथ्या दिवशी मारामारीचा प्रकार झाला. दरम्यान याचवेळी दोन गट समोरासमोर येऊन दंगामस्ती करणे, दमबाजी करणे, असे प्रकार होतच असतात. काही वर्षांपूर्वी अशा घटनांना राजकीय रंग येऊन तासगावात तलवारी घेऊन  राडा झाला होता. त्यामुळे पोलिसांनी अशा रोडरोमिओ व भांडखोर तरुणांना वेळीच चोप देण्याची गरज आहे.  तब्बल एक तास पूर्ण शहरात हा प्रकार सुरू होता. मात्र पोलिसांनी उशिरापर्यंत त्याची माहितीही नव्हती. तर पोलिसांचे  गोपनीय पथक, निर्भया पथकही नेहमीप्रमाणे गायबच होते. त्यामुळे अशा रोडरोमियोंवर पोलिसांकडून कारवाई होणार का, असा सवाल आता निर्माण झाला आहे.