होमपेज › Sangli › इंटरनेटवरून माल देण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांना गंडा

इंटरनेटवरून माल देण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांना गंडा

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 12:52AMसांगली : प्रतिनिधी

इंटरनेटद्वारे मालाची ऑर्डर देऊन कंपनीच्या बँक खात्यावर पैसे भरूनही माल मिळाला नाही. त्याबाबत संबंधित कंपनीला विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. माल देण्याच्या बहाण्याने कंपनीने महिलेला साडेचार लाख रूपयांचा गंडा घातला आहे. याबाबत निशा प्रकाश तिग्याणी (वय 48, रा. गणेशनगर, पाचवी गल्ली, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी बंगळुरू (कर्नाटक) येथील चिआरा ग्लोबल रिसोर्सेस प्रा. लि. कंपनीचे संचालक मनोहररेड्डी मरमरेड्डी रामचंद्ररेड्डी  यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी फिर्यादीनुसार दिलेली माहिती अशी ः निशा तिग्याणी यांनी इंटरनेटद्वारे रामचंद्ररेड्डी यांच्या या कंपनीशी संपर्क साधला.  कंपनीकडून त्यांनी दि. 7 फेबु्रवारी 2018 रोजी ऑप्टीमम न्युट्रीशन गोल्ड हे फूड सप्लीमेंट मागवले. यासाठी त्यांनी कंपनीच्या बँक खात्यावर 36 हजार 480 रुपये आरटीजीएसने भरले. पैसे मिळाल्यानंतर कंपनीने तिग्याणी यांची ऑर्डर पाठवली. त्यामुळे त्यांचा कंपनीवर विश्वास बसला.

दि. 21 फेबु्रवारीरोजी पुन्हा तिग्याणी यांनी कंपनीला ऑर्डर दिली. त्यासाठीचे 4 लाख 56 हजार रुपयेही त्यांनी कंपनीच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे भरले.  तिग्याणी यांनी ऑर्डर लवकर पाठवण्याबाबत कंपनीचे रामचंद्ररेड्डी यांना सांगितले. त्यांनीही ऑर्डर पाठवून देतो, असे सांगितले. मात्र, आठ ते दहा दिवसानंतरही तिग्याणी यांना माल मिळाला नाही. त्यांनी कंपनीशी संपर्क केला. मात्र, कंपनीकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.  मालही मिळाला नाही. तिग्याणी यांनी आपली फसवणूक झाल्याची शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हेडकॉन्स्टेबल राजेंद्र रेळेकर हे तपास करीत आहेत.