होमपेज › Sangli › जिल्ह्यात पोकळीच पोकळी; संजयकाका, कुठेही घुसा! : दिलीपराव पाटील

जिल्ह्यात पोकळीच पोकळी; संजयकाका, कुठेही घुसा! : दिलीपराव पाटील

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 07 2018 11:46PMसांगली ः प्रतिनिधी

कृष्णा खोरे विकास  महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा बँकेतर्फे खासदार संजय पाटील यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी चौफेर राजकीय टोलेबाजी केली. ‘जिल्ह्यात सर्वत्र पोकळीच पोकळी आहे. संजयकाका, तुम्ही कुठेही घुसा. तुम्हाला जाईल तिकडे संधीच संधी आहे’, असे ते म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर सभागृहात हास्याची लकेर उमटली. 

खासदार पाटील  जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने हा सत्कार समारंभ आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. माजी आमदार विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, विशाल पाटील, डी. के. पाटील व संचालक, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, विकास सोसायटींचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

संजयकाका नशिबवान !

दिलीपराव पाटील म्हणाले, खासदार  पाटील फारच नशिबवान आहेत. जिल्ह्यात सध्या पोकळीच पोकळी आहे. कृष्णविवरच निर्माण झाले आहे. जिकडे घुसाल तिकडे संधी मिळेल. पोकळी सर्वत्रच आहे व सर्वांनाच तुम्ही आपले 
वाटता.

आमचे खासदार 5 वर्षे भेटत नव्हते

माणसांची जिथे झुंड असेल तिथे संजय पाटील असतातच. हे त्यांच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे. आम्ही खासदार बघितले. अनुभवले. आमच्या खासदारांची पाच-पाच वर्षे भेटच होत नव्हती. मंत्रालयातही कधी दिसायचे नाहीत. ते थेट ‘वरून’ (दिल्लीतून) आलेले असायचे आणि वरतीच असायचे. 

आमच्या आमदारांकडे मात्र नेहमी गर्दी असायची. त्यामुळे खासदार कामाचा नसतो. आमदारच कामाचा असतो असा समज पक्का झाला होता. मात्र खासदार पाटील यांनी खासदाराची व्याख्याच बदलली आहे. 

खासदार काय काय कामे करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. संजय पाटील यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाल्याने जिल्ह्यातील सर्व पाणी योजना पूर्णत्वास जातील. जिल्हा सुजलाम् सुफलाम् होईल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. 

.. तर मैदानावर जाहीर सत्कार करू

पाटील म्हणालेे, संजय पाटील हे राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत.  जशास तसे वागून न्याय देणारे युवकांना आवडतात. संरक्षणाची शाश्‍वती त्यांना त्यांच्याकडून मिळते. ज्या झाडाखाली सावली असते तिथे माणसे जातात. खासदार पाटील यांना प्रमोशन मिळणार असल्याचे भाजपच्या मंत्र्यांनी म्हटलेले आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर जिल्हा बँकेत नव्हे; तर बाहेर मैदानावर त्यांचा जाहीर सत्कार करू. 

दिल्लीतही यंत्रणा सज्ज

जिल्ह्यातून कोणीही व्यक्ती, कार्यकर्ता दिल्लीत गेला की तिथे खासदार पाटील यांची यंत्रणा तयार असते. केंद्र शासनातील कामे मार्गी लावून दिली जातात. राहण्या-जेवणासह सर्व मदत होते. आमच्यावेळी आमच्या खासदारांचा दिल्लीत फ्लॅट कुठे होता हे कधीच कळाले नाही, असेही दिलीपराव पाटील यांनी सांगितले.