Mon, Mar 18, 2019 19:29होमपेज › Sangli › अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा संकोच होत आहे

अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा संकोच होत आहे

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 11:59PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

आज समाज अस्वस्थ आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत आहे. दलित, महिला, शेतकरी यांचे प्रश्‍न गंभीर आहेत. याला साहित्यातूनच वाचा फोडली पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.येथे मराठी साहित्य परिषदेच्यावतीने प्राचार्य शरद भोसले  यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘समाज आणि साहित्य’ या विषयावर  ते बोलत होते. 

देशमुख म्हणाले, साहित्य आणि समाज अभिन्न आहे.  साहित्य हे कधीच वैयक्तिक नसते. लेखक साहित्यातून सामाजिक दर्शन घडवित असतो. साहित्य ही सांस्कृतिक प्रक्रिया आहे. जीवनाचे सर्वोच्च मूल्य साहित्य-संस्कृती आहे. ते  म्हणाले, समाज परिवर्तन म्हणजे प्रगतीवाद. मात्र  बदल  हा विधायक, पुरोगामी, शोषणाविरोधी हवा. प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. गरिबी आणि श्रीमंती यातील फरक कमी करणे म्हणजे प्रगतीवाद आहे. देशात बालकामगार ही मोठी समस्या असून यामुळे त्यांचे बालपण हिरावून घेतले आहे.  स्त्रीभ्रूण हत्या सामाजिक पापाला आमंत्रण देणे आहे. ते म्हणाले, देशात झुंडशाही वाढली आहे. गोवंश हत्त्येच्या नावाखाली लोकांच्या हत्त्या होत आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न गंभीर आहेत. 

आज शेतकर्‍यांच्या मुलांची लग्‍नेही होत नाहीत. दलित लोकांवरील अत्याचार वाढत आहेत. अंधश्रद्धेविरोधात आवाज उठविला पाहिजे. लेखकांनी लेखणी धीटपणे वापरून अन्यायाविरोधात आवाज उठविला पाहिजे.  न्याय व्यवस्था, प्रसारमाध्यमे लेखकांच्या पाठीशी आहेत. यावेळी शैलजा पाटील यांच्या ‘हुंकार’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील,  प्रा. प्रदीप पाटील, प्रा. दशरथ भोसले, दि. बा. पाटील, दीपा देशपांडे, आर. डी. सावंत, प्रा. राजेंद्र कुरळपकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ.  दीपक स्वामी यांनी सूत्रसंचलन केले. 

श्रीमंतीमागे गुन्हा लपलेला...

हजारो  लोक श्रीमंत होत असताना लाखो  लोक गरीब होत आहेत. गरीब, श्रीमंती यातील फरक वाढत आहे. श्रीमंतीमागे एक गुन्हा तरी लपलेला असतोच. त्याशिवाय श्रीमंती येत नाही, अशी टीकाही देशमुख यांनी केली.