Mon, Apr 22, 2019 01:44होमपेज › Sangli › रेवणगाव घाटात भीषण अपघात; तीन जण ठार

रेवणगाव घाटात भीषण अपघात; तीन जण ठार

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 11:41PMविटा : वार्ताहर

रेवणगाव (ता. खानापूर) येथील वळणावर भरधाव वेगाने आलेल्या डंपरने एस.टी.ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार, तर पाच जण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी (दि. 24) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. 

विजय जालिंदर कुंभार (वय 46 रा. खानापूर), तानाजी विलास जाधव (वय 47, रा. भडकेवाडी) आणि सुनंदा उत्तम यादव (वय 49, रा. वाटुंबरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची विटा पोलिसांत नोंद झाली आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : मंगळवारी आटपाडी आगाराची कराड-आटपाडी ही एस.टी. (एमएच12 सी 7670) चालक यू. आर. जाधव घेऊन निघाले होते. गाडी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रेवणगाव घाट चढून आटपाडीकडे निघाली होती. त्याच वेळी खानापूरहून विट्याकडे डंपरमधून दगडी खडी घेऊन चालक सागर तानाजी चौगुले हा विट्याकडे भरधाव वेगाने निघाला होता. 

रेवणगाव घाटात डंपरचालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपरची एस.टी.ला जोरदार धडक बसली. यात चालकाच्या बाजूचा पत्रा डंपरने कापत नेला. या अपघातात एस.टी.तून प्रवास करणारे विजय कुंभार, तानाजी जाधव आणि सुनंदा यादव यांना डोक्याला, मानेला गंभीर 

मार लागून रक्‍तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सत्वशीला श्रीरंग ढाणे (वय 60), श्रीदत्त सुनील ढाणे (वय 4 वर्षे) आणि सई सुनील ढाणे (वय 9 वर्षे तिघे रा. ढाणेवाडी, ता. कडेगाव), शालिनी शांताराम हेलवंडे (वय 19, रा. चिपळूण) आणि डंपर चालक सागर चौगुले (रा. मणेराजुरी, ता. तासगाव) हे जखमी झाले. 

अपघातातील जखमींना प्रवाशांनी तात्काळ मदत करीत चार रुग्णवाहिकेतून विटा येथील  रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ, नानासाहेब मोहिते, एम. व्ही. माने, एस. टी. चे वाहतूक नियंत्रक विनायक माळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. 

अपघातानंतर डंपर रस्त्याकडेला पलटी झाला. अपघातात मृत झालेले विजय कुंभार हे वेजेगाव येथील हायस्कूलवर शिपाई होते. ते शाळेचे कामकाज पाहून घरी खानापूरला निघाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले असा परिवार आहे. 

तानाजी जाधव हे शेती करतात. ते आजारी नातेवाईकाला पाहून रत्नागिरीहून खानापूरकडे निघाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. सुनंदा यादव या भूड (ता. खानापूर) येथे नातेवाईकांकडे आल्या होत्या. वाटुंबरे (ता.सांगोला) येथे एस.टी. ने निघाल्या होत्या.

येथील ग्रामीण रुग्णालयात जि.प. उपाध्यक्ष सुहास बाबर, एस.टी. च्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर, निरीक्षक आलम देसाई, उदय पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांची व जखमींची विचारपूस केली. ग्रामीण रुग्णालयात मृतदेहांचे उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Tags : sangli, Fatal accident, Revangaon Ghat, Three people killed,