Fri, Apr 26, 2019 19:25होमपेज › Sangli › शेतकर्‍यांचा पाटबंधारे कार्यालयात गोंधळ

शेतकर्‍यांचा पाटबंधारे कार्यालयात गोंधळ

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 22 2018 12:09AMसांगली/लिंगनूर :  प्रतिनिधी

अनेक अडथळे पार करत म्हैसाळ उपसा सिंचन योजना गेल्या महिन्यात सुरू झाली. या योजनेचे पाणी जत, कवठेमहांकाळ तालुक्यांपर्यंत पोहोचले; मात्र मिरज तालुक्यातील मालगाव येथे पाणी मिळत नसल्यामुळे तेथील शेतकरी शनिवारी आक्रमक झाले. त्यांनी पाटबंधारेच्या म्हैसाळ योजनेच्या कार्यालयात चांगलाच गोंधळ घातला. यावेळी त्यांची अधिकार्‍यांसोबत वादावादी झाली. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी कार्यालयातील फायली, कागदपत्रे भिरकावली. मात्र, याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीच नोंद नसल्याचे सांगण्यात आले. 

म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्यासाठी जानेवारीपासून विविध संघटना, पक्षांकडून आंदोलने करण्यात आली होती. मात्र थकबाकीमुळे ही योजना सुरू करण्यात अडचणी होत्या. खासदार संजय पाटील व जिल्ह्यातील इतर आमदारांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून अखेर कृष्णा खोरे महामंडळाकडून पाणीपट्टीतून रक्कम उसणी घेऊन मार्च महिन्यात योजना सुरू केली.

योजना सुरू होऊन महिनाभर झाला तरी मालगाव परिसरात पाणी मिळत नव्हते. जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील पाणी थांबवून जवळच्या मालगाव भागात प्रथम पाणी देण्याची मागणी करण्यासाठी शनिवारी दुपारी मालगाव परिसरातील सुमारे पन्नास ते साठ शेतकरी ताकारी म्हैसाळ सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे यांना भेटले. यावेळी शेतकर्‍यांनी पाणी देण्याची मागणी केली. काहींनी जोर-जोरात घोषणाबाजी केली. पाणी काही दिवसांत मिळणार असल्याचे सांगत तांत्रिक अडचणी सांगण्याचा प्रयत्न नलवडे यांनी केला, मात्र आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करीत नलवडे यांच्याशी वादावादी केली. तर काहींनी नलवडे यांच्या दालनातील फायली, कागदपत्रे भिरकावत पाटबंधारे प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान याप्रकरणी पाटबंधारे विभागाकडून कोणताही तक्रार दिली नसल्याचे संजयनगरचे पोलिस  निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी सांगितले. 

Tags : sangli, irrigation office, Farmers mess, sangli news,