Sun, Apr 21, 2019 00:14होमपेज › Sangli › शेतकरी भीक मागतोय; सरकारला शरम वाटली पाहिजे

शेतकरी भीक मागतोय; सरकारला शरम वाटली पाहिजे

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 7:30PMसांगली : प्रतिनिधी

शेतकर्‍यावर रेल्वेत भीक मागण्याची वेळ येण्यास हे सरकारच जबाबदार आहे. सरकारला त्याची शरम वाटायला पाहिजे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सांगली महापालिका क्षेत्रातील युवक राष्ट्रवादीच्या बुथ आढावा बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी जयंत पाटील येथे आले होते. त्यावेळी  त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

एक शेतकरी रेल्वेत भीक मागतोय याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झालेले आहे. त्याकडे लक्ष वेधले असता  पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर ही दूरवस्था ओढवण्यास हे सरकारच जबाबदार आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांची कर्जफेडीची प्रवृत्ती असते. कर्ज बुडवणे ही शेतकर्‍यांची कधीच प्रवृत्ती नव्हती आणि नाही. मात्र शेतीत काही पिकत नाही. उत्पादनाचा खर्च वाढला आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही. महागाई वाढली आहे. शेतकरी दीनवाणा झाला आहे. रेल्वेत भीक मागण्याची वेळ त्यातूनच त्या शेतकर्‍यावर आली असावी. सरकारला याची शरम वाटायला पाहिजे. शासनाने संबंधित शेतकर्‍याला बोलावून मदत केली पाहिजे. 

जयंत पाटील म्हणाले, राज्य सरकारने केलेली कर्जमाफी अर्धवट आहे. सरसकट कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादीने आग्रहाने मांडली होती. मात्र शासनाने अनेक निकष, अटी लावल्या. दीड लाखांपर्यंतच्याच कर्जमाफीचा निर्णय घेतला. पण कर्जाचा मोठा बोजा असलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या अशा या अर्धवट कर्जमाफीने  शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला नाही आणि कर्जमाफीचा राजकीय फायदा शासनालाही मिळालेला नाही.