Wed, Jan 23, 2019 11:23होमपेज › Sangli › कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 12:10AMउटगी  ः वार्ताहर

आकळवाडी (ता. जत) येथील संगप्पा परगोंडा मणंकलगी या शेतकर्‍याने कर्जास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे  गावावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान संगप्पा याने विषप्राशन केल्याची माहिती 

कुटुंबियांना मिळाली. त्यानंतर त्यांना विजापूर येथील  इस्पितळात दाखल केले होते. मात्र उपचारास  प्रतिसाद देत नसल्याने सायंकाळी डॉक्टरांनी अन्य ठिकाणी  नेण्यास सांगितले. त्यांना  अन्यत्र नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यात झाली आहे.

संगप्पा  मणंकलगी  यांनी शेतीत सुधारणा करण्यासाठी एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या बोर्गी बुद्रूक येथील शाखेतून काही वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. मात्र शेतात पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. बँकेने वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस पाठवली होती. त्या नोटीशीच्या धसक्याने त्यांनी विष पिऊन जीवन संपवल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. 

दरम्यान अज्ञात कारणामुळे विष प्राशन  करून त्यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरणप्पा आप्पासाब मणंकलगी यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,  दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान प्रकाश वालीकर, बालगावचे उपसरपंच इराणा सारवाड, राम कांबळे, भाऊसाहेब मोरे, मंतय्या स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

Tags : sangli, Utagi,  Farmer Suicide, sangli news,