Thu, Jun 20, 2019 00:32होमपेज › Sangli › कारखानदारांचा उसावर दरोडा

कारखानदारांचा उसावर दरोडा

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 05 2018 8:10PMसांगली : प्रतिनिधी

साखर कारखानदारांनी एफआरपी नुसार साखरेला दर देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र  साखरेचे दर घसरल्याचा कांगावा करून पहिला हप्ता कमी देण्याचा प्रकार करणे म्हणजे कारखानदारांनी शेतकर्‍यांच्या उसावर भरदिवसा टाकलेला दरोडा आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, एफआरपी नुसार शेतकर्‍यांना दर न मिळाल्यास कारखान्यातून साखरेचे एकही पोते बाहेर पडू देणार नाही, असाही इशारा पाटील यांनी दिला. 

ते म्हणाले, साखरेचे दर अल्प काळातच घसरले होते. मात्र त्या अगोदर साखर प्रति किलोस 42 रुपयांपर्यंत होती. त्याचा फायदा कारखान्यांनी घेतला आहे. आताही साखर 38 रुपयापर्यंत आहे. त्यामुळे किमान 3000 हजार रुपये प्रति टन उसासाठी  देणे कारखान्यास अवघड नाही. आपल्याकडे साखरेचा उतारा सरासरी 12 टक्के आहे. त्यामुळे साखरेस प्रति टनास 4200 रुपये मिळतात. बगॅसपासून 600 रु. तर  मळीपासून 200 रु. मिळतात. त्यातील खर्च वजा जाता उसाला 3500 रु. दर देणे सहज शक्य आहे. 

ते म्हणाले, दर घसरल्याचा कांगावा करून कारखानदार जाहीरपणे कायदा मोडत आहेत. आम्हाला कोणी काही करणार नाही, या भ्रमात त्यांनी राहू नये.  आघाडी सरकारच्या काळात कारखाने अडचणीत असताना तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्या समितीने सुमारे 7 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. त्या प्रमाणे सध्याच्या सरकारने कारखान्यांना मदत करायला  हवी. काँग्रेस - राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला म्हणून मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांची लूट करू नये. एफआरपी प्रमाणे दर न देणार्‍या कारखान्यांना   साखर आयुक्तांनी  नोटिसा  काढल्या आहेत. 

त्या नोटीसांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांची आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.