Sat, Jul 20, 2019 23:20होमपेज › Sangli › जिल्हा परिषदेत ‘ट्रॅक्टर’वर पडणार उड्या

जिल्हा परिषदेत ‘ट्रॅक्टर’वर पडणार उड्या

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 10:20PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना सुरू होत आहे. ट्रॅक्टर अनुदानासाठी मोठ्या संख्येने अर्ज येणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत गर्दी वाढणार आहे. लाभार्थी निवड ‘लकी ड्रॉ’ द्वारे होणार आहे. ‘लकी ड्रॉ’ द्वारे लाभार्थी निवडीची ही पहिलीच वेळ आहे. शिफारशीने निवडी होणार नसल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्यांमध्ये ‘खुशी कम, गम जादा’ आहे. 

कृषी अभियांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास व अन्य काही योजना जिल्हा परिषदेकडून राज्य कृषी विभागाकडे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय) वर्ग झालेल्या आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर अनुदान योजना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविल्या जात आहेत. मात्र अनुदानासाठी अर्ज करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या जास्त आणि लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट कमी यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित रहात आहेत. 

प्रती शेतकरी 90 हजार अनुदान

जिल्हा परिषदेने स्विय निधीतून ट्रॅक्टर अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2018-19 मध्ये शंभर शेतकर्‍यांना अनुदान दिले जाणार आहे. 8 अश्‍वशक्ती ते 25 अश्‍वक्ती क्षमतेच्या ट्रॅक्टर खरेदी अनुदानासाठी जिल्हा परिषद स्वीय निधीतून 90 लाख रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्येक शेतकर्‍याला 90 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. अनुदान लाभार्थीच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. लाभार्थी निवड ‘लकी ड्रॉ’ द्वारे होणार 
आहे.
व्यक्तीगत लाभाच्या योजनांमधील लाभार्थी निवड सदस्यांच्या शिफारशीने  व्हावी, अशी मागणी बहूसंख्य सदस्यांची असते. ट्रॅक्टर खरेदीसाठी जिल्हा परिषद शेतकर्‍याला 90 हजार रुपये अनुदान देणार आहे. त्यामुळे लाभार्थी निवड शिफारशीने व्हावी, अशी इच्छा अनेक सदस्यांची आहे. मात्र पारदर्शी  निवडीसाठी लाभार्थी निवड ‘लकी ड्रॉ’ द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला
 आहे.