होमपेज › Sangli › शेतकरी संघटना कार्यकर्ते-पोलिस झटापट

शेतकरी संघटना कार्यकर्ते-पोलिस झटापट

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 10 2018 11:45PMसांगली : प्रतिनिधी

दूधदरवाढ करावी, उसाची थकित बिले द्यावीत या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना गेटवर अडवले. त्यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. 

शेतकर्‍यांची बिले वेळेवर न देणार्‍या साखर कारखानदारांना पायघड्या घालता आणि आम्हाला कशासाठी अडवता, असा जाब विचारत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. 

दरम्यान मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, युवा नेते संदीप राजोबा, महावीर पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा आडमुठे, संजय बेले उपस्थित होते. 

दूध दरवाढ, उसाची थकित बिले आणि शेतकरी प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन आदि मागण्यांसाठी स्वाभिमानीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.   विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलकांच्या हातात ऊस आणि दुधाच्या किटल्या होत्या.

कडक उन्हात दुपारी  जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा धडकला. पोलिसांनी तो अडवला. आम्हाला  आत सोडा. अधिकार्‍यांशी थेट चर्चा करायची आहे, अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी  नकार दिल्याने कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. अडवणूक केल्याचा आरोप करीत दूध ओतले. काही कार्यकर्त्यांनी सांगली- मिरज रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्वांची समजूत काढली. 
संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी चव्हाण यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी अनेक कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही.  त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. किमान 27 रुपये दूध दर मिळायला हवा. दर न देणार्‍या सहकारी दूध संस्थांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली.