Sun, Jul 21, 2019 16:56
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › दूध पावडर-साखरेचा बफर स्टॉक करा

दूध पावडर-साखरेचा बफर स्टॉक करा

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 16 2017 10:26PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : प्रतिनिधी

राज्य सरकारने घटत्या साखर दराच्या पार्श्‍वभूमीवर ऊस व दूध  खरेदी दरप्रश्‍नी स्वत:च तोडगा काढावा. साखर व दूध पावडरीचा सरकारनेच बफर स्टॉक करावा. साखर कारखाने, दूध संघ आणि शेतकर्‍यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग बंद करावा, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. 

सध्या साखरेचे दर 3 हजार 500 वरून 3200 पर्यंत खाली आले आहेत. साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे ऊस दर शेतकर्‍यांना देण्याची सक्ती आहे. त्याचबरोबर इकडे दूध खरेदी दराची सक्तीची अट राज्यातील दूध संघांवर सरकारने लादली आहे. या पार्श्‍वभूमीवर दै. ‘पुढारी’शी बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले, सरकारने साखर कारखाने, दूध संघ आणि शेतकर्‍यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग बंद करावा. 

सध्या साखरेचा प्रतिक्विंटल भाव घटत आहे. साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांना एफआरपीप्रमाणे भाव देताना अडचण होऊ नये म्हणून सरकारने साखरेचा बफर स्टॉक करावा, असे सांगून ते पुढे म्हणाले, शेतकर्‍यांचा ऊस उत्पादनाचा खर्च वाढत आहे. चांगले म्हणविणारे साखर कारखानेदेखील चांगला ऊस दर द्यायला तयार नाहीत. शेतकर्‍यांना का वेठीस धरता?

ते म्हणाले, साखर आणि दूध पावडर हा काही नाशवंत माल नाही. साखरेचे दर घटत आहेत. मार्च, एप्रिल 2018 पर्यंत राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालणार आहेत. तोपर्यंत साखरेचा साठा वाढणार आहे. त्यानंतर येणारे सण व येणारी साखरेची मागणी व संभाव्य साखरेचे वाढणारे दर विचारात घेऊन राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर साखर खरेदी करावी, साखरेचा बफर स्टॉक करावा. दर वाढल्यानंतरचा फायदा सरकारने घ्यावा. तसेच सध्या संघांकडूनही दूध खरेदी दराची सक्ती असल्याने दूध संघांची अडचण झाली आहे. सरकार त्यावर मार्ग काढायला तयार नाही. 

दूध हा नाशवंत माल असला तरी  दूधपावडर मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्याचा बफर स्टॉक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.