Fri, Apr 26, 2019 09:53होमपेज › Sangli › द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला

द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला

Published On: May 26 2018 12:51AM | Last Updated: May 26 2018 12:42AMसांगली : प्रतिनिधी

द्राक्ष  पीक विमा योजनेचे निकष बदलावेत, अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसलेल्या पिकांना एकरी दोन लाख रूपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला . आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,  द्राक्ष बागायतदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष आर्वे, संदीप राजोबा, महावीर पाटील, विकास देशमुख, संजय बेले, अशोक खाडे, भारत चौगुले   आदी  सहभागी झाले होते.   

गेल्या पंधरा दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका येळावी, आरवडे, हातनूर, बेडग, धुळगाव, सोनी परिसरातील सुमारे 4 ते 5 हजार एकरावरील द्राक्ष बागांना    बसला. फलधारणा करणार्‍या काड्या खराब झाल्या आहेत.   दुबार छाटणीची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.  त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  या प्रश्‍नासंदर्भात मोर्चा काढला. विश्रामबागपासून मोर्चाला सकाळी सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. हातात द्राक्षाच्या वेली घेतलेल्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा  प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. 

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी यासंदर्भात कृषी विभाग  आणि विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले.
 निवेदनात म्हटले आहे, की    द्राक्ष पीक विमा योजनेंत मे, जून, जुलै, ऑगस्ट या चार महिन्यात नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी.  पर्जन्यमापक प्रत्येक गावात बसवावेत, विमा योजनेचे स्वतंत्र कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन करावे, द्राक्ष, डाळींबाचा समावेश मनरेगामध्ये करावा. घरांची पडझड झालेल्यांना एकरी एक लाख रुपये 
मिळावेत.