Tue, Jun 25, 2019 13:09होमपेज › Sangli ›  ‘वसंत, यशवंत’ला अभय;  बार नाहरकत शुल्क महाग

 ‘वसंत, यशवंत’ला अभय;  बार नाहरकत शुल्क महाग

Published On: Dec 20 2017 1:43AM | Last Updated: Dec 20 2017 12:05AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री (स्व.) वसंतदादा पाटील व (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू केलेली वसंत घरकुल व यशवंत घरकुल योजना बंद होणार नाही. जिल्हा परिषद स्वीय निधीतून या योजनांवर तरतूद केली जाईल. या घरकुल योजना राबविल्या जातील, असे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी रायगाव येथे केन अ‍ॅग्रो एनर्जी कारखाना कार्यस्थळावर झाली. अध्यक्षस्थानी संग्रामसिंह देशमुख होते. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, तम्मनगौडा रवि, ब्रह्मदेव पडळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने तसेच सदस्य व खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. 

सन 2017-18 साठी निधीअभावी वसंत घरकुल योजनेसाठी लाभार्थी निवड न करण्याचा निर्णय जिल्हा परिषद समाजकल्याण समितीने घेतलेला आहे. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षातच वसंत घरकुल योजना ‘समाजकल्याण’ने गुंडाळली. त्यावरून सत्यजित देशमुख, संजय पाटील व सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. वसंत घरकुल योजना व यशवंत घरकुल योजना सुरू राहील. जिल्हा परिषद स्वीय निधीतून तरतूद केली जाईल. या घरकुल योजना बंद होऊ दिल्या जाणार नाहीत, असे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. 

69 प्रकारच्या नाहरकत दाखल्यांसाठी शुल्कवाढ

आरोग्यविषयक नाहरकत दाखले प्रमाणपत्रशुल्क वाढीचा निर्णय झाला.  बिअरबार, परमिटरूम, देशी दारू दुकान, बिअरशॉपी, वाईन शॉपी नाहरकत दाखल्याचे शुल्क पंधरा हजार रुपयांपर्यंत वाढवावे, अशी मागणी केली. अ‍ॅड. शांता कनुंजे, सत्यजित देशमुख यांनी केली. सर्व सदस्यांनी शुल्कवाढीची आग्रही मागणी केली. बिअरबार, परमिटरूम, देशी दारू दुकान, बिअरशॉपी,  वाईन शॉपी, स्टील रोलींग मिल, स्फोटक पदार्थ, खाण उत्खनन, कारखाना, स्टोनक्रशर, पेट्रोलपंप, हॉटमिक्स प्लँट, दूध चिलींग प्लँट, दवाखाना बांधणे, विटभट्टी, व्हीडीओ सेंटर, मटण/चिकन सेंटर, पिठाची गिरणी यासह विविध 69 प्रकारच्या नाहरकत दाखले व नूतनीकरणासाठी शुल्क वाढ करण्याचा निर्णय झाला. एक हजार रुपये ते पंधरा हजार रुपयांपर्यंत शुल्कवाढ ठरावाला मंजुरी देण्यात आली. 

खासगी दवाखान्यात झालेल्या कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्याचे दाखवणे, शासन अनुदानावर डल्ला मारणे याप्रकरणी चौकशी अहवालाचे काय झाले, असा प्रश्‍न सत्यजित देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे म्हणाले, चौकशीत दोन मुद्यांसंदर्भात  अनियमितता सिद्ध होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे. दोषी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाईसाठी शासनाला अहवाल पाठविला जाणार आहे. कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होईल.