Thu, Jan 24, 2019 13:56होमपेज › Sangli › कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाप्रकरणी अहवाल

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाप्रकरणी अहवाल

Published On: Dec 20 2017 1:43AM | Last Updated: Dec 20 2017 12:02AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

खासगी दवाखान्यात झालेल्या प्रसुती तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आरोग्य केंद्रात झाल्याचे दाखवणे तसेच शासन अनुदानावर डल्ला मारल्याप्रकरणी चौकशी अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांना सादर झाला आहे. या अहवालाचे विश्‍लेषण सुरू आहे. दरम्यान जिल्हयात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अशाप्रकारे चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कुटूंब कल्याण योजना राबविण्यात येते. आरोग्य केंद्रांना कुटूंब नियोजन शस्त्रक्रियांचे टार्गेट दिलेले असते. सर्वाधिक शस्त्रक्रिया केलेल्या आरोग्य केंद्राला तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांना पुरस्काराने गौरवले जातेे. मात्र गैरमार्गाने टार्गेट पूर्ण करणे आणि शासन अनुदानावर डल्ला मारण्याचे प्रकार चव्हाट्यावर येत आहेत.

कवठेमहांकाळ तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील या प्रकाराबाबतच्या तक्रारीनंतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. डॉ. पोरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांना अहवाल दिला आहे. हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्याकडे सादर झाला आहे. राऊत म्हणाले, आरोग्य विभागाकडून अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचे विश्‍लेषण केले जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.