Fri, Apr 26, 2019 03:24होमपेज › Sangli › बदलीत बोगसगिरी; 9 शिक्षकांची वेतनवाढ रद्द

बदलीत बोगसगिरी; 9 शिक्षकांची वेतनवाढ रद्द

Published On: Aug 31 2018 1:42AM | Last Updated: Aug 31 2018 12:27AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हांतर्गत बदलीच्या पोर्टलवर  खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेतलेल्या 9 शिक्षकांवर एक वेतनवाढ रद्दची कारवाई होणार आहे. 22 शिक्षकांनी दिलेल्या माहिती, कागदपत्रांबाबत खातरजमा केली जाणार आहे. सुनावणीसाठी गैरहजर राहिलेल्या 10 शिक्षकांना 2 दिवसांची मुदत देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. 

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीत खोटी माहिती भरून सोयीच्या बदलीचा लाभ घेतल्याच्या तक्रारी व कागदपत्रातील त्रुटीवरून 231 शिक्षकांची गुरूवारी जिल्हा परिषदेत सुनावणी झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी सुनावणी घेतली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निशादेवी वाघमोडे तसेच गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. 

190 शिक्षकांची माहिती बिनधोक

शिक्षक बदलीत बोगसगिरी, माहितीतील त्रुटींवरून 231 शिक्षकांची सुनावणी झाली. त्यापैकी 190 शिक्षकांची माहिती व बदली योग्य असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. सुनावणीला 10 शिक्षक गैरहजर होते. त्यांना सुनावणीस उपस्थित राहण्यास दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

सेल्समन, पतसंस्था, कंपनीतील नोकरी, अँजिओग्राफी अमान्य

संवर्ग 1 व संवर्ग 2 चा लाभ घेतलेल्या 9 शिक्षकांची बदली अमान्य करण्यात आली आहे. यामधील 8 शिक्षकांनी पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत बदलीचा लाभ घेतला आहे. पती-पत्नी या दोहोंपैकी एकजण खासगी कंपनी, पतसंस्था, खासगी संस्थेतील वैयक्तिक मान्यता नसलेले शिक्षक, सेल्समन म्हणून नोकरीत असल्याची माहिती समोर आली आहे. पती-पत्नी एकत्रिकरणच्या लाभासाठी ते पात्र ठरत नसल्याचे कारण देत बदली अमान्य करण्यात आली आहे. अँजिओेप्लास्टी झाली असल्यास दुर्धर आजार अंर्तगत सोयीच्या बदलीचा लाभ मिळतो. मात्र अँजिओग्राफी केेलेल्या एका शिक्षकाने दुर्धर आजारी म्हणून सोयीच्या बदलीचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची बदली अमान्य केली आहे. नऊ शिक्षकांची एक वेतनवाढ रद्द होणार आहे. 

खोटी माहिती भरून बदली करून घेतलेल्या शिक्षकांनी ज्यांना विस्थापित केले आहे अशा शिक्षकांना रँडोमायझेशन राऊंड मध्ये बदली मिळाली असेल तर त्या शिक्षकाच्या पदावर खोटी माहिती भरून बदली करून घेतलेल्या शिक्षकाची बदली करावी आणि विस्थापित झालेल्या शिक्षकाला त्यांच्या मूळ जागी पूनर्पदस्थापना द्यावी, असा शासन आदेश आहे. त्यानुसार कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.