Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Sangli › कडधान्यांत घसरण; ‘मेन्यू कार्ड’ तेजीतच

कडधान्यांत घसरण; ‘मेन्यू कार्ड’ तेजीतच

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 9:11PMसांगली : उध्दव पाटील

कडधान्य, भरडधान्याच्या दरात घसरण झाली असली तरी हॉटेलमधील ‘मेन्यू कार्ड’ मात्र तेजीतच आहे. उडीद डाळीचे घाऊक विक्रीचा दर 15 हजार ते 18 हजार रुपयांवरून 4 हजार 500 ते 6500 रुपयांपर्यंत घसरला आहे. दर तिपटीहून कमी झाल्याने उडीद वड्याचा दरही कमी व्हायला पाहिजे होता. पण प्रत्यक्षात मात्र दर वाढले आहेत. उडीद वडा 40 रुपयांवरून 42 रुपये झाला आहे. ग्राहकांची खुलेआम लूट होत आहे. याकडे प्रशासन लक्ष देणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  

सन 2015 मध्ये डाळींचे दर भडकले होते. तूर व उडीद डाळीचे दर आकाशी भिडले होते. सर्वसामान्यांच्या घरात या डाळी शिजल्या नव्हत्या. सन 2015-16 मध्ये उडीद डाळीचा होलसेलचा क्विंटलचा भाव सरासरी 15 हजार  ते 18 हजार रुपये होता.  तूर डाळीचा भावही चढाच होता. किरकोळ बाजारात हे दर आणखी चढे होते. सन 2016-17 मध्येही उडीद डाळ क्विंटलला 14 हजार ते  18 हजार रुपये होती.  मात्र सन 2017-18 मध्ये उडीद डाळीचे भाव चांगलेच घसरले. शेतकर्‍यांना फटका बसला. उडीद डाळींचा क्विंटलचा होलसेल भाव 4 हजार 500 ते 6 हजार 500 रुपये झाला. तिपटीहून अधिक दर घसरला.

उडीद डाळीपासून उडीद वडा, डोसा तयार केला जातो. हरभरा डाळीपासून भजी, वडा होतो. इडलीची चटणीही केली जाते. तूर डाळीपासून तयार होणारा ‘डाळ तटका’ खूपच चविष्ट आणि अधिक मागणी असणारा आहे. मूग डाळीचा वापर भाजीत केला जातो. तांदळाचा वापर राईससाठी तसेच डोसामध्ये केला जातो. गव्हापासून पुरी, चपाती, समोसे तयार केले जातात.  कडधान्य, भरडधान्य, अन्नधान्याचे दर वाढल्यानंतर हॉटेलमधील ‘मेन्यू कार्ड’ बदलते. मेन्यू कार्डमधील पदार्थांचे दर वाढतात. खाद्य पदार्थांचा आकारही आणि प्रमाण हेही कमी होते.  कडधान्य, भरडधान्याचे दर कमी झाले की हॉटेलमधील ‘मेन्यू कार्ड’मध्येही बदल होणे आवश्यक असते. पण ‘मेन्यू कार्ड’ तेजीतच असतो. खरेतर ही ग्राहकांची लूट आहे. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही.