Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Sangli › बोलण्यात अडखळला अन् सापडला!

बोलण्यात अडखळला अन् सापडला!

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 11:02PMसांगली : अभिजित बसुगडे

मारुती चौकातील दुकानात एक तरूण येतो. खाद्यपदार्थ विकत घेतो. त्याचवेळी राऊंड फिगर बिल करा असा आग्रहही धरतो. कोणी नसल्याचे पाहून दोन हजारांची एकच नोट देतो. शंका आल्याने नोटेबद्दल चौकशी केल्यावर पहिल्यांदा एटीएममधून मिळाल्याचे सांगतो. खोदून विचारल्यावर भावाने दिल्याचे सांगतो. त्याच्या बोलण्याचा संशय आल्याने दुकानाच्या मालक कांचन ठोंबरे पोलिसांना माहिती देतात. आणि त्या तरूणाला ताब्यात घेतल्यावर बनावट नोटा खपवणार्‍यांच्या टोळीचाच पर्दाफाश होतो. ठोंबरे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळेच बनावट नोटा खपवणारी टोळी जेरबंद झाली आहे. 

शहरातील मारूती चौकात कांचन शिवाजी ठोंबरे यांचे ठोंबरे अ‍ॅन्ड सन्स नावाचे चिरमुरे, फरसाण, वेफर्स आदी खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान आहे. गुरुवार दि. 23 ऑगस्ट रोजी दुपारी एक पांढरा शर्ट घातलेला पाठीला सॅक अडकवलेला तरूण (राज सिंग) येतो. घरात लहान मुलाचा वाढदिवस असल्याचे सांगत तो दुकानातून एक किलो फरसाण, 50 रूपयांचा भडंग आणि 30 रूपयांची शेव विकत घेतो. त्यानंतर बिलाची चौकशी करतो.

त्यावेळी ठोंबरे त्याला 175 रूपये बिल झाल्याचे सांगतात. नंतर तो राऊंड फिगर दोनशे रूपये बिल करा असा आग्रह धरतो. त्यामुळे ठोंबरे त्याला लाडूचे दोन पाकीट देतात. त्यानंतर तो पैसे देण्यासाठी खिशात हात घालून दोन हजारांची नोट काढतो. इतक्यात त्या दुकानात आणखी एक गिर्‍हाईक येते. त्यामुळे काढलेली नोट तो पुन्हा खिशात ठेवतो. गिर्‍हाईक गेल्यानंतर तो पुन्हा नोट काढून कांचन ठोंबरे यांना देतो. मधल्या वेळेत ठोंबरे त्याची चौकशी करतात. 

त्यावेळी तो आपण कराडहून आल्याचे त्यांना सांगतो. मात्र त्याच्या बोलण्याच्या भाषेवरून तो कराडचा नसल्याचे त्यांच्या लक्षात येते. त्यावरून त्या त्याला हटकतात. ठोंबरे यांना संशय आल्याने त्या शेजारी हातगाड्यावर असलेल्या एका तरूणाला बोलवतात. तो तरूणही राज सिंगकडे नोटेबाबत चौकशी करतो. त्यावेळी राज त्याला एटीएममधून नोट आणल्याचे सांगतो. त्या तरूणाने एटीएम दाखवण्याचा आग्रह धरल्यावर तो भावाने मला नोट दिल्याचे सांगतो. 
या सर्व प्रकारामुळे कांचन ठोंबरे यांना शंका येते. त्या राजकडून नोट स्वीकारून त्याला अठराशे रूपये परत देतात. मात्र त्याचवेळी सांगली पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक सुशांत ठोंबरे यांना घडलेल्या घटनेची माहिती देतात. सुशांत ठोंबरेही क्षणाचा विलंब न लावता मारूती चौकात येतात. तोपर्यंत राज सिंग काही अंतरावर गेलेला असतो. त्याला परत पकडून आणण्यात येते. कांचन ठोंबरे यांच्या दुकानात परत आल्यानंतर राज गयावया करू लागतो. त्यांच्या पायाही पडतो. नंतर माझी चूक झाली असे म्हणत अठराशे रूपये तसेच घेतलेले सर्व पदार्थ परत करून ती नोट परत घेतो. 

त्यानंतर पोलिस नाईक सुशांत ठोंबरे त्याला ताब्यात घेतात. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर नरेंद्र ठाकूर, प्रेमविष्णू राफा यांची माहिती मिळाल्यावर त्यांना अटक करण्यात आली. कांचन ठोंबरे यांनी प्रसंगावधान राखून वेळीच पोलिसांना कळवल्याने बनावट नोटा खपवणारी मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे.