Fri, Aug 23, 2019 23:14होमपेज › Sangli › मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी हालचाली

मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी हालचाली

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 11:21PMसांगली : प्रतिनिधी

बनावट नोटा प्रकरणाची व्याप्‍ती वाढत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट होत आहे. या प्रकरणाचे मूळ पश्‍चिम बंगालमध्ये असल्याने नोटा तयार करणार्‍यासह त्या कल्याणमध्ये पोहच करणार्‍याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक लवकरच पश्‍चिम बंगालला जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी पोलिसांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, दोन हजारांच्या 123 नोटा, आठ मोबाईल जप्‍त करण्यात आले आहेत. 

याप्रकरणी राज सिंग, नरेंद्र ठाकूर, प्रेमविष्णू राफा, सूरज ऊर्फ मनिष ठाकुरी, जिलानी शेख यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवार दि. 23 रोजी मारूती चौकातील एका दुकानात खाद्य पदार्थ खरेदी केल्यानंतर या संशयितांनी तिथे दोन हजाराची बनावट नोट दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी प्रेमविष्णू राफा आणि नरेंद्र ठाकूर यांना कल्याण येथून अटक केली. त्यांच्याकडून दोन हजारांच्या 29 नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. शिवाय दोन मोबाईलही जप्त करण्यात आले होते. राफाकडे कसून चौकशी केल्यानंतर ऐरोलीतून सूरज ठाकुरी, जिलानी शेख यांना अटक करण्यात आली आहे. 

अटकेतील संशयितांकडे कसून चौकशी केल्यानंतर पश्‍चिम बंगालमधून या नोटा कल्याणमध्ये येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या नोटा पुरवणार्‍यासह त्या तयार करणार्‍याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक लवकरच पश्‍चिम बंगालला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अटकेतील संशयितांकडे कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.