Wed, Sep 19, 2018 16:20



होमपेज › Sangli › बनावट नोटा प्रकरणाचा म्होरक्या पश्‍चिम बंगालचा

बनावट नोटा प्रकरणाचा म्होरक्या पश्‍चिम बंगालचा

Published On: Aug 31 2018 1:42AM | Last Updated: Aug 31 2018 12:31AM



सांगली : प्रतिनिधी 

बनावट नोटा प्रकरणात पश्‍चिम बंगालचा राणा शेख याचे नाव पुढे आले आहे. तोच या टोळीचा म्होरक्या  असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पश्‍चिम बंगाल कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.  दरम्यान, शहर पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली आहे. तपासासाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. या पथकाला बनावट नोटा प्रकरणाच्या तपासात  महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. 

पोलिसांनी बनावट नोटाप्रकरणी सध्या राज राजकुमार उज्जेनलाल सिंह (वय 28, कल्याण, ठाणे), प्रेमविष्णू रोगा राफा (26, काटेमानेवली, कल्याण) आणि नरेंद्र आशापाल ठाकूर (33, आनंदवाडी, कल्याण) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन हजारांच्या   बनावट नोटाही   जप्‍त केल्या आहेत. 

बसस्थानकजवळील एका दुकानात खाद्यपदार्थ खरेदी केल्यानंतर तिथे दोन हजारांची बनावट नोट दिली. गुरुवारी (ता.23) रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी राजसिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र त्याच्या साथीदारांनी पलायन केले. सिंह चौकशीला प्रतिसाद देत नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार अन्य दोघांना कल्याणमध्ये अटक करण्यात आली. मात्र, टोळीतील चौथा साथीदार मनीष (पूर्ण नाव निष्पन्न नाही) हा अद्यापही पसार आहे. 

तिघांचीही शहर पोलिसांनी गुरुवारी कसून चौकशी केली. या प्रकरणाचे पश्‍चिम बंगाल कनेक्शन समोर आले आहे. या टोळीतील अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी पथक मुंबईला रवाना झाले आहे. निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील या पथकात उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलिस नाईक बिरोबा नरळे, हवालदार सुशांत ठोंबरे, दिनकर चव्हाण यांचा पथकात समावेश आहे.