Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Sangli › अपयशी मुख्यमंत्री बदलले तरीही सत्तांतर अटळ : चव्हाण

अपयशी मुख्यमंत्री बदलले तरीही सत्तांतर अटळ : चव्हाण

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:26AMसांगली : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर आज महाराष्ट्र पेटला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री बदलून भाजपला फायदा होणार नाही. अपयशी मुख्यमंत्री बदलला तरीही महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे, असे राजकीय भाकित काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सांगली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा संयुक्‍त जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम,  प्रतीक पाटील, जयश्री पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे, प्रकाश सातपुते उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील इंजिनिअर, आर्किटेक्ट, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक व विविध क्षेत्रातील मानयवरांशी चव्हाण व पाटील यांनी संवाद साधला. 

चव्हाण म्हणाले, लोकांना विकासाची मोठी स्वप्ने दाखवत सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील भाजप शासनाने लोकांचा विश्‍वासघात केला आहे. महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे सरकार आहे. मात्र सर्व कारभार भाजपच करत आहे. राजकीय स्थैर्याच्या दृष्टीने हे सरकार स्ट्राँग आहे. मात्र तरीही मुख्यमंत्री  फडणवीस हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. व्यापारी, उद्योजक आर्थिक मंदीतून जात आहेत. तरुणांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न आहे. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली असती तर मराठा आरक्षणाचा प्रश्‍नच निर्माण झाला नसता. रोजगार नसल्याने आज मराठा तरूण रस्त्यावर उतरला आहे.महाराष्ट्र पेटला आहे. 

ते म्हणाले,मध्यंतरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत राज्यातील नेतृत्व बदलावर चर्चा झाली असावी. बंद खोलीत नेमकी काय चर्चा झाली माहिती नाही. मात्र या भेटीपासूनच राज्यात नेतृत्व बदल होणार असल्याचे संकेत शिवसेना देत आहे. भाजपमधील सहकारी पक्षच नेतृत्व बदलाचे संकेत देत असल्याने त्यात तथ्य असावे. चव्हाण म्हणाले, सरकार चालविण्याचा अनुभव असणार्‍यांच्या हाती सांगली महापालिकेची सत्ता द्या. भाजपचा पराभव करा.भाजपच्या या पराभवाचे पडसाद राज्यभर उमटले पाहिजेत.जयंत पाटील म्हणाले, नोटाबंदी, जीएसटी नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचे विदारक चित्र पुढे येत आहे. मंदीची लाट आली आहे. जीएसटी, नोटाबंदीचा त्रास सांगली महापालिका निवडणुकीच्या मतदानावेळी मतदारांनी विसरू नये. सांगली महापालिका क्षेत्रात पायाभूत सेवा-सुविधांबरोबरच उद्योग, व्यापार, रोजगार वाढावा यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पाठपुरावा करेल. 

लोकशाही, घटनेला धोका; ईडी, सीबीआयची दहशत

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केंद्रातील भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर लोकशाही, निवडणूक आणि घटना राहणार नाही. सर्वच विरोधी नेत्यांना तुरुंगात जावे लागेल. संविधानाला धोका निर्माण होईल. मोदी सरकारने ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दहशत निर्माण केली आहे. भीतीने व्यापारी, उद्योजक बोलायला तयार नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा उडाला आहे. अमृत योजनेवर अवघा 0.75 टक्‍का निधी खर्च झाला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारी आहे. ही बुलेट ट्रेन होऊ देणार नाही.