Sun, Mar 24, 2019 23:11
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › कडेगावात बाटली उभीच 

कडेगावात बाटली उभीच 

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 30 2018 12:02AMकडेगाव  : शहर प्रतिनिधी 

कडेगाव शहरात  दारूची बाटली उभीच राहिली आहे. शहरात चार प्रभागांत रविवारी (दि. 29)   दारूबंदीसाठी मतदान झाले. यामध्ये या  चारही  प्रभागांत दारूची बाटली आडवी करण्यात महिलांना अपयश आले.

शहरात प्रभाग क्रमांक 9, 10, 11 आणि 14 मध्ये दारूची बाटली आडवी की उभी यासाठी रविवारी सकाळी 8 ते 5 यावेळेत  मतदान पार पडले. मतदानाला सकाळी 10  वाजेपर्यंत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता; परंतु त्यानंतर मतदानासाठी महिलांची  गर्दी कमी झाली. चारही प्रभागांत आडवी बाटलीसाठी महिलांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आडवी बाटलीसाठी एकूण महिला मतदारांच्या 50 टक्के महिला मतदारांचे मतदान आडवी बाटलीला होणे आवश्यक होते; परंतु तेवढे मतदान या चारही प्रभागात झाले नाही त्यामुळे  शहरात बाटली उभीच राहिली.

प्रभाग क्रमांक 9 मध्ये  झालेल्या मतदानात एकूण 278 पैकी 151 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीला 134 तर उभ्या बाटलीसाठी 11 महिलांनी  मतदान केले. तर 6 मते बाद ठरली.

प्रभाग क्रमांक 10 मध्ये  झालेल्या मतदानात एकूण 309 पैकी 152 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीला 123 तर उभ्या बाटलीसाठी फक्त 23 महिलांनी मतदान केले.13 मते बाद ठरली. यामुळे या प्रभागातील महिलांना  बाटली आडवी करण्यात अपयश आले. प्रभाग क्रमांक 11 मध्ये झालेल्या मतदानात एकूण 285 पैकी 76 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीला 68 तर उभ्या बाटलीसाठी 6 महिलांनी मतदान केले. 2 मते बाद ठरली. यामुळे या प्रभागात देखील बाटली उभीच राहिली.

प्रभाग क्रमांक 14  मध्ये  झालेल्या मतदानात एकूण 220 पैकी 47 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीला 42 तर उभ्या बाटलीसाठी 2 महिलांनी मतदान केले. 3 मते बाद ठरली. यामुळे या प्रभागातही बाटली उभीच राहिली. या चारही प्रभागात  बाटली  उभी राहिल्याने दारूबंदीच्या लढ्याला अपयश आले आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी चरण कोल्हे  यांनी निकाल जाहीर केले. तहसीलदार अर्चना शेटे, नायब तहसीलदार राजेंद्र यादव, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंत पवार उपस्थित होते. कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी आणि चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Tags : Sangli, Failure, women, abduct liquor ban,