Mon, Apr 22, 2019 02:27होमपेज › Sangli › अतिरिक्त दूध, भुकटीचा शेतकर्‍यांना दणका

अतिरिक्त दूध, भुकटीचा शेतकर्‍यांना दणका

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 9:51PMइस्लामपूर : प्रतिनिधी

दूध व्यवसायावर चरितार्थ अवलंबून असणारा शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. प्रतिदिन सुमारे 70 हजार लिटर अतिरिक्त दूध उत्पादन अन् 40 हजार मे. टन दूध भुकटी (पावडर) चा अतिरिक्त साठा आहे. घटत्या दूध दरामुळे शेतकर्‍याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुग्ध व्यवसाय हा शेतकरी शेतमजूर यांच्या चरितार्थाचा मुख्य व्यवसाय आहे. परंतु अलिकडे या व्यवसायाला ग्रहण लागले आहे. आणि सध्या तरी हा व्यवसाय खूपच अडचणीत सापडलेला आहे. परंतु या प्रश्‍नाकडे शासन व राज्यकर्ते गांभिर्याने बघत नाहीत.

या व्यवसायातील म्हैस दुधाला उत्पादकाला मिळणारा दर हा फॅट व एस.एन.एफ. प्रमाणे 6.5 फॅट व 9.0 एस.एन.एफ. ला सध्या 36 रुपये दर मिळत आहे. परंतु अलिकडे म्हैस दूध उत्पादनात घट झालेली दिसून येते. त्यामुळे म्हैस दूध दर कमी झालेला नाही. परंतु आहे तोसुद्धा फारसा उत्पादन खर्चाचा विचार करता परवडणारा नाही. त्यामुळेसुद्धा म्हैस दूध उत्पादन वाढत नाही. दुसरीकडे गाईचे दूध म्हणजे एक चिंताजनक बाब झाली आहे. गाय दुधाच्या  व्यवसायास  शेतकर्‍यांनी पसंती दिली असून हा व्यवसाय शेतकर्‍यापासून शेतमजुरापर्यंत बहुसंख्य ठिकाणी केला जातो. अनेक ठिकाणी किमान एक-दोन गायी पाळलेल्या दिसतात. यावरून हा व्यवसाय दुय्यम न राहता हा चरितार्थाचा प्रमुख व्यवसाय झाला आहे.परंतु या व्यवसायाचे गणित चुकले आहे. आज एक गाय 10 लिटर दूध देत असेल तर तिला 6 किलो पशुखाद्य, 20 किलो वैरण, मजुरी, औषध पाणी इत्यादी खर्च हा जवळपास 200/- रुपये येतो आणि तिच्या दुधापासून मिळणारे उत्पन्न मात्र 170 ते 180 रुपये इतके आहे.

दूध संघाकडून दर कमी

दूध संघ किंवा खरेदीदारांकडून देखील दिवसेंदिवस दर कमीच होत असून त्यांनाही अनेक प्रक्रियांना सामोरे जावे लागत आहे. परंतु शासन मात्र सध्या या विषयावर विचार करण्यास तयार नाही. मूळ गायीच्या दुधाला आधारभूत किंमत मिळतच नाही. म्हणजेच प्रक्रिया करणार्‍या संस्था किंवा संघ दर देऊ शकत नाहीत.

नाशवंत दूध भुकटीचा प्रश्‍न

दूध हे नाशवंत असल्यामुळे त्याची दूध भुकटी करणे हाच एकमेव उपाय असल्याने दूध भुकटी करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. परंतु आज जवळपास 40 हजार मे. टन दूध भुकटी पडून आहे. दूध भुकटीची मागणी देशांतर्गत बाजारपेठात फारशी नसल्यामुळे त्याचाही दर प्रतिकिलो 110/- ते 125/- रुपयांपर्यंत आहे. त्याची बाजारपेठ शोधायची झाल्यास परदेशी बाजारपेठ शोधून परदेशात पाठविण्यासाठी केंद्र सरकारने त्यासाठी कायमस्वरुपी मदत करणे गरजेचे आहे. परंतु केंद्र सरकार, राज्य सरकारही मदत तोकडी करत आहे. शेतकर्‍यांच्या या ज्वलंत प्रश्‍नावर व त्यांचे अर्थार्जन चालणार्‍या या दूध व्यवसायावर जोपर्यंत ठोस निर्णय सरकार घेत नाही तोपर्यंत आंदोलन, मोर्चे काढून सरकारला जाग येईपर्यंत शेतकरी, शेतमजूर यांची थट्टा होत राहणार का? हाच खरा प्रश्‍न आहे.

70 हजार लिटर अतिरिक्त दूध...

सध्या राज्यात, देशात दुधाचे उत्पादन अतिरिक्त आहे. त्यापैकी एकट्या महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादन दररोज 1 कोटी 40 लाख लिटर आहे. पिशवी (पाऊच) विक्री 40 टक्के म्हणजे 60 लाख लिटर आहे. 10 लिटरचे उपपदार्थ तयार होतात. म्हणजे दररोज गाईचे 70 हजार लाख लिटर दूध अतिरिक्त आहे.