Tue, Mar 26, 2019 20:07होमपेज › Sangli › तासगावात पेट्रोलपंपावर दरोड्याचा बनाव उघड

तासगावात पेट्रोलपंपावर दरोड्याचा बनाव उघड

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 07 2018 11:04PMतासगाव : शहर प्रतिनिधी

येथील निमणी रस्ता परिसरातील पेट्रोलपंपावर मंगळवारी मध्यरात्री केलेला दरोड्याचा बनाव अवघ्या पाच तासांत उघड करण्यात तासगाव पोलिसांना यश आले. तो बनाव पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक व कर्मचारी यांनीच केला असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी पेट्रोलपंपावरील व्यवस्थापक रोहन बाळासाहेब कांबळे (वय 22, रा. शाहूनगर, चिंचणी, ता. तासगाव) व कर्मचारी अतुल संजय कांबळे (वय 23, रा. कवठेएकंद) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी :  शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर शुभांगी दिलीप लोकरस (रा. सातारा) यांचा निशिगंधा पेट्रोलपंप आहे. या पंपावर व्यवस्थापक म्हणून रोहन कांबळे याची नऊ महिन्यांपूर्वी नियुक्‍ती करण्यात आली होती. अतुल कांबळे याला दहा दिवसांपूर्वी कामावर घेण्यात आले होते. 

मंगळवारी रात्री अतुल व रोहन दोघे कामावर होते. रात्री साडेअकराच्या सुमारास सामसूम झाल्यानंतर दोघांनी सर्व काम आवरले.  दिवसभरात जमा झालेली रक्कम अडीच लाख रुपये तीन गाठोड्यांमध्ये भरली व टेबलवर ठेवली. 

दरम्यान रोहन व अतुल यांनी पूर्वतयारी करून दरोड्याचा प्लॅन तयार केला होता. त्यांनीच सांगितलेली हकीकत अशी होती : रात्री बाराच्या सुुमारास काही लोक आले व ‘गाडीमध्ये पेशंट आहे, तेल संपले आहे, मदत करा’, अशी विनवणी केली.

त्यावेळी रोहन बाहेर आला असता त्याला मारहाण केली. रोहनच्या गळ्याला चाकू लावून अतुलला सर्व रक्कम आणण्यास सांगितले. त्याने आत जाऊन दोन गाठोड्यांमध्ये असलेले दीड लाख रुपये चोरट्यांना दिले. 

पेट्रोलपंपाचे मालक लोकरस यांचे भाऊ श्रीकांत रणखांबे त्याठिकाणी आले. त्यांना दरोड्याच्या या हकीकतीबद्दल संशय वाटला. त्यांनी पंपावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता त्यामध्ये कोणीही आल्याचे दिसले नाही. तसेच रोज कपाटात रक्कम ठेवली जाते.  मात्र  काल ही रक्कम बाहेर ठेवली होती. 

त्यांनी रात्री  दीड वाजता तासगाव पोलिसांकडे रोहन व अतुल यांच्यावर संशय व्यक्‍त केला. पोलिसांनी दोघांनाही पंपावरूनच ताब्यात घेतले. चौकशी केली असता या दोघांनीही  दरोड्याचा बनाव करून चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी या दरोड्याच्या बनावामध्ये आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय व्यक्‍त केला आहे. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक उमेश दंडिले करीत आहेत.