Thu, Apr 25, 2019 23:24होमपेज › Sangli › दूध पावडर निर्यातीला २०; शेतकर्‍यांना ६ रुपये अनुदान द्या

दूध पावडर निर्यातीला २०; शेतकर्‍यांना ६ रुपये अनुदान द्या

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 10:08PMइस्लामपूर : वार्ताहर

राज्यातील दूध व्यवसायावर आलेले संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने दूध पावडर निर्यातीला 20  आणि  राज्य सरकारने गाय दूध उत्पादकांना थेट 6 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य दूध उत्पादक कृती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. 

राज्यातील दूध संघ अडचणीत आणून ते गुजरातच्या अमूल दूध संघाला खरेदी करता यावेत, अशी परिस्थिती राज्य शासन तयार करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पाटील म्हणाले, सरकारने दूध व्यवसायासाठी जाहीर केलेेले पॅकेज तुटपुंजे आहे. सध्या देशात 2 लाख  टन तर राज्यात 43 हजार टन दूध पावडर शिल्‍लक आहे. तिची किमान 160 रुपये किलो दराने विक्री होणे गरजेचे आहे.सध्या हे दर 120 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यातच पावडरला मागणीही नाही. त्यामुळे खरेदीदार गायीचे दूध स्वीकारण्यासही नकार देत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी पावडर निर्यातीला किमान 20 रुपये अनुदान देणे गरजेचे आहे. तसेच कर्नाटकप्रमाणे राज्य सरकारने दूध उत्पादकांना थेट सहा रुपये अनुदान द्यावे. तशी मागणी कृती समितीच्यावतीने पंतप्रधान मोदी यांच्याकडे करण्यात येणार आहे. 

दूध संघ अडचणीत आणण्याचा डाव...

ते म्हणाले, आता राज्य शासनाने गायीचे दूध 3.2 फॅटने व 8.3 एसएनएफने खरेदी करावे असे परिपत्रक काढले आहे. राज्यातील दूध संघांनी इतक्या कमी प्रतीचे दूध खरेदी केले तर त्याला बाजारपेठेत ग्राहक मिळणार नाहीत. त्यामुळे दूध संघ आणखी अडचणीत येणार आहेत. राजारामबापू दूध संघ तर या प्रतीचे दूध खरेदी करणार नाही. गुजरात व कर्नाटकमध्ये असा कायदा नाही. त्यामुळे राज्य शासन येथील दूध संघाबाबत वेगवेगळे कायदे करून दूध संघांच्या अडचणीत भर घालत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे वक्तव्यही त्याचीच प्रचिती देत आहे. राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, कार्यकारी संचालक सुरेश पटेल, अधीक्षक लालासो साळुंखे उपस्थित होते. 

दूध पावडरचा साठा खराब होण्याची भीती...

राज्यातील दूध व्यवसायावर गंभीर असे संकट आले आहे. दूध पावडरीला मागणीच नसल्याने ती पडून आहे. तिची एक्सपायरी डेट एक वर्षाची असते.  या पावडरीची एक्सपायर डेट संपत आली आहे. ती वेळेत विक्री झाली नाही तर मोठे नुकसान होणार आहे , असे  पाटील म्हणाले.