Wed, Mar 20, 2019 23:34होमपेज › Sangli › दुग्धजन्य पदार्थ चीनला निर्यात करा

दुग्धजन्य पदार्थ चीनला निर्यात करा

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 11:05PMसांगली : प्रतिनिधी

चीन सध्या दुग्धजन्य पदार्थ इतर देशाकडून आयात करीत आहे. या परिस्थितीचा फायदा उठण्यासाठी चीनला दुग्धजन्य पदार्थ निर्यात करण्यासंदर्भात भारताने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भात व्यापक बैठक बोलवू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. 

याबाबत शेट्टी यांनी सांगितले की, देशातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. भारतात दुधाचे अतिरिक्त उत्पादन होत असल्याने ही परिस्थिती ओढावलेली आहे. उत्पादन खर्च वाढत चालला असून दर मात्र अतिशय कमी मिळत आहे. दूध पावडरीचे दर देखील कोसळले आहेत. अतिरिक्त दुधाचे करायचे काय? असा प्रश्न देशातील दूध संघांना पडला आहे. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 जुलैपासून राज्यात दूध बंद आंदोलन पुकारले आहे.  

त्यांनी पुढे सांगितले की, या पार्श्वभूमीवर मी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी पत्रव्यवहार केला. तसेच दूरध्वनीवरून चर्चा देखील केली. या पत्रात मी म्हटले आहे की, चीनचे अमेरिकेसह इतर काही देशाही  मोठ्या प्रमाणात व्यापार युध्द सुरू आहे. चीनची बँक देखील भारतात सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. मध्यतंरी काही कारणांमुळे आपल्या देशाने चीनच्या दुग्धजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. तसेच चीननेदेखील आपल्या उत्पादनावर बंदी घातलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे सध्या परिस्थिती सुधारलेली असल्याचे दिसत आहे. यामुळे चीनमध्ये आपल्या देशाकडून  दूध उत्पादने निर्यात केल्यास शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारणार आहे. सरकारने त्वरित दुधाच्या निर्यात धोरणासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील आपण  केली आहे. यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांच्याशीही पत्रव्यवहार केला आहे. दोन्ही मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.