होमपेज › Sangli › नोकरभरतीसाठी होणार परीक्षा; मुलाखत नाही

नोकरभरतीसाठी होणार परीक्षा; मुलाखत नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडील लिपिक, शिपाई/रखवालदारांच्या 19 पदांची भरती परीक्षेद्वारे होणार आहे. मात्र मुलाखत घेतली जाणार नाही. लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे नियुक्ती दिली जाणार आहे. सर्व 19 पदे आरक्षणातील आहेत. 

बाजार समिती संचालक मंडळाची सभा मंगळवारी झाली. अध्यक्षस्थानी सभापती प्रशांत शेजाळ होते. उपसभापती रामगोंडा संती, संतोष पाटील, जीवन पाटील, अभिजीत चव्हाण, वसंतराव गायकवाड, दिनकर पाटील, कुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, तानाजी पाटील, जयश्री पाटील, दयगोंडा बिरादार, अजित बनसोडे, विठ्ठल निकम, सुरेश पाटील, उमेश पाटील, मुजीर जांभळीकर, शीतल पाटील, सचिव पी. एस. पाटील, उपसचिव एन. एम. हुल्याळकर उपस्थित होते. 

बाजार समितीला 19 कर्मचारी भरतीसाठी ‘पणन’कडून मंजुरी मिळाली आहे. भरतीसाठी जाहिरात दिली जाणार आहे. 19 जागांमध्ये लिपिकांच्या 10 (कनिष्ठ लिपिक 3, संगणक चालक 1, टायपिस्ट 3, सेस लिपिक 3) जागांचा समावेश आहे. ही सर्व पदे आरक्षित आहेत. अनुसूचित जाती-3, अनुसुचित जमाती-2, विमुक्त जाती अ-1, भज ड- 1, विशेष मागास प्रवर्ग-1, ओबीसी आरक्षित 2 पदे आहेत. 
 शिपाई पदे 4 आणि रखवालदार 5 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती 3, विमुक्त जाती अ 1, भ. ज. ब- 1, भ. ज. ड-1 आणि ओबीसी आरक्षित 3 पदे आहेत. 

सांगली मुख्य बाजार आवार, विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केट, मिरज दुय्यम बाजार आवार, कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवार, ढालगाव दुय्यम बाजार आवार तसेच जत दुय्यम बाजार आवारात विविध 11 कोटी 40 लाखांच्या कामांना संचालक मंडळ सभेत मंजुरी देण्यात आली.