Sat, Feb 23, 2019 08:35होमपेज › Sangli › दरमहा होते 50 दुचाकींची चोरी

दरमहा होते 50 दुचाकींची चोरी

Published On: Aug 30 2018 1:29AM | Last Updated: Aug 30 2018 12:25AMसांगली : अभिजित बसुगडे

गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातून एका महिन्यात सरासरी पन्नास दुचाकींची चोरी होत असल्याचे पोलिसांकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात दुचाकी चोर्‍यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

दुचाकी चोरट्यांकडून केवळ नवीन गाड्याच  टार्गेट केल्या जात होत्या.  मात्र, अलिकडे जुन्या दुचाकी चोरीचेही प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गाडीचे लॉक तोडून सहजपणे त्या चोरल्या जात आहेत. गर्दीच्या ठिकाणीही अगदी बेमालूमपणे गाड्या चोरल्या जात आहेत. नंबर प्लेट नसलेल्या, शोरूममधून नुकत्याच आणलेल्या गाड्या चोरट्यांकडून अधिक प्रमाणात लंपास केल्या जात आहेत.  दुचाकी चोर्‍यांमध्ये विशिष्ट कंपनीच्याच गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. त्याशिवाय सहजपणे लॉक निघणार्‍या तसेच ते  न केलेल्या गाड्याही चोरीला जाण्याचे प्रमाण आहे.

आतापर्यंत उघडकीस आलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सर्वाधिक प्रमाणात युवक संशयित असल्याचे स्पष्ट झाले आहे.  पोलिसांकडून सातत्याने अशा चोरट्यांवर कारवाई केली जात असली तरी या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात नव्याने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे अनेकदा दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.  मात्र, उपनगरे तसेच गर्दीच्या ठिकाणी दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक आहे. चोरट्यांचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत चित्रीकरण होऊनही ते सापडत नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.