Mon, Aug 19, 2019 09:46होमपेज › Sangli › इस्लामपुरातील अपघातात अभियंता ठार

इस्लामपुरातील अपघातात अभियंता ठार

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 11:14PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : शहर वार्ताहर

येथील आष्टा नाका परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात शुभम धोंडीराम माळी (वय 21, रा. आष्टा नाका, इस्लामपूर) या अभियंत्याचा मृत्यू झाला होता.  याप्रकरणी संशयित ट्रॅक्टरचालकास पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

शुभम माळी व त्याचा मित्र आकाश सावंत  मोटारसायकलवरून बसस्थानक परिसरात गेले होते. तेथून घरी येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली होती. त्यात शुभम गंभीर जखमी झाला होता. आकाश याच्या पायाला मार लागला. दोघांना उपचारासाठी इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

शुभमची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला  कराड येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  त्याच्या मित्रांनी परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. यामध्ये शुभम याच्या मोटारसायकलपुढे एक मोपेड व त्याच्या पुढे संशयित ट्रॅक्टर दिसून आला.

ते गेले दोन दिवस त्या ट्रॅक्टरचा शोध घेत होते. बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो उसाने भरलेला ट्रॅक्टर आष्टा नाका परिसरात आढळून आला. नगरसेवक शहाजी पाटील, शुभमचे मित्र, कार्यकर्त्यांनी संशयित ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात नेला.